गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:40+5:302021-02-05T09:06:40+5:30

आदर्की : फलटण-कोरेगाव-खंडाळा तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या सालपे येथील शेतात रानगव्यांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. तसेच एकाला जखमी केल्याने सालपे ...

One wounded in a cow attack | गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

गव्याच्या हल्ल्यात एक जखमी

Next

आदर्की : फलटण-कोरेगाव-खंडाळा तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या सालपे येथील शेतात रानगव्यांनी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. तसेच एकाला जखमी केल्याने सालपे परिसरात घबराट पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, सालपे गावातील शेतकऱ्यांच्या फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यांच्या सीमेवर सालपे घाट, बिरोबा मंदिराच्या मागे, धोम-बलकवडी कालवा ब्रीज परिसरात जमिनी आहेत. त्या परिसरात बागायती क्षेत्र आहे, तर शेजारी वन विभागाचे क्षेत्र असल्याने वृक्ष लागवड झालेली आहे. रविवार, दि. ३१ रोजी दुपारी एकच्या दरम्यान सालपे ता. फलटण, कोपर्डे ता. खंडाळा येथील शिवारात शेतकऱ्यांना तीन रानगवे दिसले. शेतकरी बचावासाठी जात असताना एका गव्याने सालपे येथील शेतकरी नीलेश तात्याबा शिंदे यांना ठोकर दिली. ते खाली पडले. त्यावेळी शेजारी काम करणाऱ्या तरुणांनी रानगव्यांना हुसकावून लावल्याने शिंदे यांचा जीव वाचला.

रानगवे सालपे, कोपर्डे परिसरात आल्याची माहिती खंडाळा व फलटण वन विभागास समजताच वनपाल एन. एन. इनामदार, वनरक्षक प्रकाश गाढवे, वनरक्षक लक्ष्मण गायकवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. रानगव्यांना हा परिसर नवखा असल्याने ते दिसेल तिकडे पळत होते. यामध्ये शेतकऱ्यांचे तारकंपाऊंड, पाईपलाईनचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया

बिरोबा मंदिरामागील शेतात काम करीत असताना अचानक रानगव्याने धडक देऊन खाली पाडले. आरडा-ओरडा केल्याने शेजारील तरुणांनी प्रसंगावधान राखत रानगव्यांना हुसकावून लावल्याने जीव वाचला. आता खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत.

- नीलेश शिंदे

जखमी शेतकरी, सालपे.

कोपर्डे, सालपे गावातून फोन आल्यानंतर घटनास्थळास भेट दिली. रानगव्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी शेतात काम करताना सावधानता बाळगावी. जंगली प्राणी दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पाडळीचे वनरक्षक लक्ष्मण गायकवाड यांनी केले.

०२आदर्की-रानगवे

सालपे-कोपर्डे परिसरातील शिवारांमध्ये रानगव्यांचे कळप शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.

Web Title: One wounded in a cow attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.