एका वर्षात डिझेल ३०, तर किराणा माल २० टक्क्यांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:36 AM2021-05-17T04:36:44+5:302021-05-17T04:36:44+5:30
सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ...
सातारा : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ३० टक्क्यांनी महागले असल्याने भाडेवाढीने किराणा मालाचेही दर वाढले आहेत. सातारा जिल्ह्यात तर किराणा जवळपास २० टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट आणखी कोलमडले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. यामुळे अनेकांचे काम गेले आहे. तसेच छोटे व्यवसायही बंद पडले आहेत, तर दुसरीकडे इंधनाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढतच चालला आहे. परिणामी महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना तर जगणे मुश्कील झालेले आहे.
गत एक वर्षापासून डिझेलचा दर जवळपास ३० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ९० रुपयांपर्यंत लिटरला भाव आहे. डिझेल महागल्याने किराणा मालातही जवळपास १५ ते २० टक्के वाढ आहे, तर खाद्यतेलात ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. साताऱ्यात किराणा माल पुण्यावरून अधिक करून येतो. पुण्यावरून माल आणताना नगामागे सरासरी २० रुपये वाढ आहे, तर खोबरे, नारळ, शाबुदाणा, गहू आणि तांदूळ परराज्यांतून येतो. परराज्यातून येणाऱ्या मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे दुकानातील किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत.
भारतात खाद्यतेलाची ७० टक्के आयात होते. खाद्यतेलाचे दर गेल्या सात महिन्यांपासून वाढलेलेच आहेत. जवळपास ७० टक्के दर वाढ आहे. १५ किलोचा सूर्यफूल तेलडबा २७००, तर शेंगदाणा तेलाचा डबा २८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नवीन पीक येत नाही तोपर्यंत खाद्यतेलाच्या दरात वाढ होतच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
किराणा दर (प्रती किलो)
मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
तूरडाळ १०० १०० १२०
हरभरा डाळ ६० ७० ८०
तांदूळ (बासमती) ३० ते ६० ३० ते ७० ३० ते ७०
साखर ३४ ३४ ३५
गूळ ४० ४० ४० ते ४५
बेसन ८० ८० ९०
...........................
तेलही दुप्पट महाग (दर प्रती लिटर)
तेल मार्च २०२० सप्टेंबर २०२० मे २०२१
शेंगदाणा १४० १५० १९०
सूर्यफूल १०० ११० १८५
राईस ब्रॅन १२० १३० १६५
सोयाबीन ९० ९५ १५५
पामतेल ८० ९० १३०
...............................
डिझेल दर (प्रती लिटर)
जानेवारी २०२० ७०.७१
जून २०२० ६७.७६
जानेवारी २०२१ ७९.९१
मे २०२१ ८९
.......................................................
कोट :
गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. त्यातच महागाई सतत वाढत चालली आहे. खाद्यतेल तर जवळपास दुप्पट वाढले आहे. या महागाईचा परिणाम महिन्याच्या बजेटवर झाला आहे. त्यामुळे इतर खर्च कमी करण्याची वेळ आली आहे.
- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी.
...........................
कोरोनाच्या संकटाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. इंधन वाढ झाल्याने किराणा साहित्यात वाढ झाली आहे. साखर, तांदूळ वगळता सर्व किराणा मालांचे दर वाढले आहेत, पण खाद्यतेलाचा दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक बजेटच कोलमडले आहे. तेल दर कमी होण्याची गरज आहे.
- मेघा राऊत, गृहिणी
.................................
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं संकट उभं आहे. त्यातच डिझेलचा दर वाढल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. सध्या माल मिळत आहे, पण साखर, गूळ, तांदूळ वगळता डाळीमागे किरकोळ वाढ आहे, तर खाद्यतेल प्रथमच उच्चांकी पातळीवर गेले असून अजून काही महिने अशीच स्थिती राहील.
- संजय भोईटे, व्यापारी.
....................................................................