कांदा स्वस्त ; वाटाणा महागला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:49+5:302021-04-03T04:35:49+5:30

सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ३०० ...

Onion cheap; Peas are expensive! | कांदा स्वस्त ; वाटाणा महागला!

कांदा स्वस्त ; वाटाणा महागला!

Next

सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ३०० पासून १३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मिरची अजून तिखटच असून कोबीचा भाव वाढू लागला आहे. तर लसणाचा दर स्थिर आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ३२८ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील महिन्यापूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर दर एकदमच गडगडला.

सातारा बाजार समितीत गुरुवारी ४८ वाहनांतून ४५७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा २१०, लसूण २० आणि आल्याची २२ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला १५० ते २०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आहे. तर वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टोमॅटो ८० ते १२०, कोबीला ४० ते ५० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर कमी झाला आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १२० अन् दोडक्याला २५० ते ३०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला क्विंटलला ३ हजारांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयापर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे. तर लसणाला क्विंटलला २ ते ६ हजारांपर्यंत भाव आला आहे. लसणाचा दरही पुन्हा थोडा वाढला आहे. वाटाण्याला ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटाण्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. बाजारात अजूनही भाज्यांचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

चौकट :

मेथी, कोथिंबीर दरात सुधारणा...

सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. मेथीच्या १३०० पेंडींची आवक झाली. याला शेकडा ७०० ते ८०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबिरीची १७०० पेंडी आली आहे. याला शेकडा दर ५०० ते ७०० रुपयांदरम्यान मिळाला. तर पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये दर आला.

......................................................

Web Title: Onion cheap; Peas are expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.