कांद्याला क्विंटलला मिळाला, ३५०० रुपयांपर्यंत भाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 12:12 PM2020-10-05T12:12:22+5:302020-10-05T12:15:51+5:30
कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत असून, रविवारी सातारा बाजार समितीत आवक वाढूनही क्विंटलला एक हजारापासून साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे कांद्याचा दर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले. तर किरकोळ स्वरुपात चांगला कांदा ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सातारा : कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येत असून, रविवारी सातारा बाजार समितीत आवक वाढूनही क्विंटलला एक हजारापासून साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे कांद्याचा दर पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले. तर किरकोळ स्वरुपात चांगला कांदा ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सातारा शेती उत्पन्न बाजार समितीत सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, खटाव, फलटण आदी तालुक्यांतून भाजीपाला व इतर माल येत असतो. दर रविवारी आवक मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच गुरुवारीही आवक वाढते. सातारा बाजार समितीत वांगी, फ्लॉवर, गवारचे दर तेजीत निघाले. तर भुसार मार्केट यार्डमध्ये शेतीमालाचे दर स्थिर होते.
सातारा बाजार समितीत वांग्याची अवघी १२ क्विंटल आवक झाली. तुलनेत आवक कमी झाली. मात्र, दर वाढला होता. १० किलोला दर ३५० ते ४५० रुपयांदरम्यान मिळाला. टोमॅटोचीही आवक बऱ्यापैकी झाली. ४५ क्विंटल आवक होऊन १० किलोला दर २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळाला.
टोमॅटोचाही दर स्थिर होता. कोबीची फक्त ४ क्विंटल आवक होऊन दर १०० ते २०० रुपये निघाला. फ्लॉवर मात्र भाव खाऊन गेला. ५ क्विंटलची आवक होऊन १० किलोला दर ४०० ते ६०० रुपये मिळाला. तर दोडक्याची २ क्विंटल आवक झाली. याला ४५० ते ५५० रुपये दर मिळाला. दरात वाढ झाल्याचे दिसन आले. कारल्याची ४ क्विंटल आवक होऊन ४०० ते ४५० रुपये दर १० किलोला मिळाला. कारल्याच्या दरात वाढ झाली.
बाजार समितीत कांद्याची ९६ क्विंटल आवक होऊन दर एक हजारापासून साडेतीन हजारापर्यंत मिळाला. तुलनेत कांद्याचा भाव वाढल्याचे दिसून आले. तर १२ दिवसांपूर्वी ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत कांद्याचा दर निघाला होता.
बाजार समितीत १० क्विंटल बटाटा आला. याला १० किलोला १०० ते ३०० रुपये दर मिळाला. यावेळी बटाट्याचा दर स्थिर राहिला तर आवक कमी झाली. वाटण्याचाही दर तेजीत आहे. १० किलोला १ हजार ते १३०० रुपये दर निघाला. पावट्यालाही दर आला. ४०० ते ६०० रुपये भाव मिळाला. गवारला ५०० ते ६०० रुपये भाव १० किलोला मिळाला. गवारच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच ७ क्विंटल आवक झाली. दरम्यान, मंडई व दुकानात मोठा कांदा ४० ते ५० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
मेथी, कोथिंबिरचे दर वाढलेलेच...
सातारा बाजार समितीत मेथीची ७०० पेंडीची आवक झाली. १०० पेंडीला दर १२०० ते १५०० रुपये मिळाला. तर कोथिंबिरच्या १ हजार पेंडीची आवक झाली. १०० पेंडीला दर १ हजार ते १५०० रुपये निघाला. तुलनेत दर चांगला मिळाला. असे असलेतरी मंडई आणि दुकानात मेथी आणि कोथिंबिर पेंडी २० रुपयांच्या पुढे होती.