दर कोलमडल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:16+5:302021-04-10T04:38:16+5:30
चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. दरम्यान, कांदा लागवड काळात ...
चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यांत कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. दरम्यान, कांदा लागवड काळात हवामानात बदल झाल्याने कांद्याची रोपे वाया गेली. त्यामुळे या अनेक शेतकऱ्यांना दोन वेळा कांदा रोपे खरेदी करावी लागली. त्यामुळे कांदा पिकास उशीर झाला. महिन्यापूर्वी कांदा दर अचानक पन्नाशी पार झाल्याने अनेकांनी मुदतीपूर्वीच कांदा बाजारात दाखल करून पैसा कमावला; मात्र त्यानंतर राज्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने हळूहळू अनेक शहरे लॉकडाऊन झाली तर सध्या राज्यभरात शनिवार, रविवारी हॉटेल, ढाबे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याने या व्यवसायाला लागणारा मोठ्या प्रमाणातील कांदा कमी झाला. त्यामुळे याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. राज्यातील कांदा बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली असून, या बाजारपेठेत कांदा खरेदी करणारा ग्राहक नसल्याने ५ रुपयांपासून ९ रुपयांपर्यंत कांदा विक्री होऊ लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या दराने कांदा विकावा लागत आहे. तर अनेक शेतकरी राज्याबाहेर बंगलोर, हुबळी या ठिकाणी कांदा पाठवतात. त्या ठिकाणीही कांदा दर १२ रुपयांपर्यंत मिळत आहे.
एकूणच वाढता उन्हाळा आणि जोडीला कोरोना, यामुळे कांदा दराची घसरण सुरू झाली आहे. इतर पिकाप्रमाणेच कांद्यालाही शासनाने हमीभाव जाहीर करून राज्यातील शेतकरी जपावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.
(कोट)
सर्वाधिक कांदा हा मोठमोठ्या हॉटेलसाठी विकला जातो. सध्या राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हे व्यावसायिक कांदा खरेदीबाबत उदासीन आहेत. यातच बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली असल्याने कांदा आहे, पण ग्राहक नाही. त्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत.
-वसंतराव भालेराव, गुरुकृपा ट्रेडिंग गुलटेकडी, मार्केट, पुणे.