कांदा आलाय काढणीला...मजूर मिळेना कामाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:39+5:302021-09-27T04:42:39+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोही परिसरात कांदा पिकाच्या काढणीची कामे वेगात सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांपासून रिमझिम ...
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोही परिसरात कांदा पिकाच्या काढणीची कामे वेगात सुरू आहेत. गेल्या आठ दिवसांपासून रिमझिम पाऊस येत असल्याने कांदा पावसाने नासून जाण्याची शक्यता असल्याने कांदा काढणीची परिसरात लगबग सुरू आहे. मका काढणीची कामेही जोमात सुरू असल्याने मजुरांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने परिसरात कांदा काढणी सुरू आहे.
पळशी, मार्डी, मोही परिसरात शेतीची कामे वेगात सुरू आहेत. त्यातच दररोज पावसाच्या सरी येत असून, काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान होत आहे. परिसरात कांदा, मका, बाजरी, पिके मोठ्या प्रमाणात केली असून सध्या कांदा, मका पिकांच्या काढणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मजूर उपलब्ध होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी सलग पाऊस पडल्याने अनेकांचे कांदा पीक शेतातच कुजले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी मका पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे मका पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कांदा पीकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे. सध्या कांद्याला एक हजार ते बाराशे प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने कांदा पीक उत्पादकात निराशा पसरली आहे. तर मजुरीचे दरही वाढले आहेत.
मजुरांची वानवा असल्याने मजुरीचे दरही २०० वरून २५० ते ३०० वर गेल्याने सामान्य शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ठिकठिकाणी जादा मजुरी देऊन मजुरांची पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे मजुरीच्या दरात वाढ होत असल्याने जिकडे अधिक मजुरी तिकडेच मजूर मजुरीसाठी जात आहेत. मजूर मिळत नसल्याने ठिकठिकाणी घराच्या घरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कामे सुरू आहेत. शाळा महाविद्यालये बंद असल्याने अनेक विद्यार्थी शेतीकामाला हातभार लावत असल्याचे दिसत आहे.
शेजारील गावातून जादा मजुरी देऊन मजूर आणावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होत असल्याने वाढत्या खर्चाचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरात कांदा हे खिशाला आधार देणारे व शेतीसाठी भांडवल देणारे पीक मानले जाते. त्यामुळे कांदा पीकही मोठ्या प्रमाणात घेतले आहे; पण यावर्षी खराब वातावरणामुळे कांद्यावर रोग पडल्याने कांद्याची पुरेशी वाढ झाली नाही. त्यामुळे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यातच दर नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.
(कोट)
मुळकुज झाल्याने बराच कांदा जळून गेला आहे. एकरात किमान दीडशे थैल्या मिळत होत्या; पण आता अवघ्या २० थैल्या निघत आहेत. काढणी काटणीला मजूर मिळत नसल्याने घराच्या घरी कुटुंबाच्या मदतीने कांदा काढणी काटणी सुरू आहे.
-दीपक देवकुळे, शेतकरी पळशी
फोटो
२६पळशी
माण तालुक्यातील पळशी परिसरात मजूर मिळत नसल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने कांदा काढणीची कामे सुरू आहेत