साताऱ्यात कांद्याच्या दरात चढ-उतार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:21+5:302021-03-05T04:39:21+5:30
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू असून गुरुवारी क्विंटलला ३ हजारांपर्यंत दर आला. तर वांगी, टोमॅटो ...
सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चढ-उतार सुरू असून गुरुवारी क्विंटलला ३ हजारांपर्यंत दर आला. तर वांगी, टोमॅटो अन् कोबीला भाव कमी मिळाला. मात्र, मिरची व गवारला चांगला दर मिळाला.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची २२६ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ५०० पासून ३ हजारांपर्यंत दर मिळाला. मागील आठ दिवसांपूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यानंतर एकदमच दर गडगडला. २५०० रुपयांपर्यंत भाव खाली आला होता.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ५७ वाहनांतून ४९६ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याची २२६ क्विंटलची आवक झाली. तर बटाटा ४७, लसूण १६ आणि आल्याची ९ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक झाली. बाजार समितीत गवारला १० किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. रविवारच्या तुलनेत दरात सुधारणा झाली. तसेच शेवगा शेंगाला ३०० ते ४५० रुपये भाव आला. शेवगा शेंगाच्या दरात उतार आला. तर वांग्याला १० किलोला ५० ते १०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ४० ते ७०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १५० अन् दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.
बटाट्याला क्विंटलला १ हजारपासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर लसणाला क्विंटलला ३ ते ६ हजारांपर्यंत भाव आला. वाटाणा अजूनही स्वस्त आहे. ३५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.
चौकट :
कोथिंबीर झाली स्वस्त...
सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दर कमी मिळाला. मेथीच्या १५०० पेंड्यांची आवक झाली. याला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची २ हजार पेंडी आली. याला शेकडा दर २०० ते ३०० रुपयांदरम्यान मिळाला. पालकला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर आला.
......................................................