ठोक बाजारात कांदा अवघा सहा रुपये किलो
By Admin | Published: January 30, 2017 11:33 PM2017-01-30T23:33:17+5:302017-01-30T23:33:17+5:30
लोणंद बाजार : आवक वाढूनही कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
लोणंद : कांद्याने डोळ्यात पाणी आणण्याचा गुण पुन्हा एकदा दाखविण्यास सुरुवात केली आहे.
कांद्याची निर्यात सुरू होऊन दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना कांद्याचे दर अचानक आणखी गडगडले आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोणंद येथील मार्केटयार्डवर सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले, तेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळले. ठोक बाजारात कांदा अवघ्या पाच ते सहा रुपये किलोवर घसरला आहे.
खंडाळा तालुक्यातून तसेच फलटण आदी भागातून लोणंद बाजारामध्ये कांदा उत्पादन शेतकरी दर सोमवारी आणि गुरुवारी कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात. वाहनभाडे, हमाली, मापाडी, उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे व कांद्याच्या आवकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कांद्याच्या सरासरी दरामुळे अवघ्या पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल दर स्थिरावले असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे.
परिसरातील सर्वच भागातून गरवा कांदा एकाच वेळी बाजारात आल्याने सध्या लोणंद बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, कर्नाटकासह अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर व स्वस्तातील कांद्याची मोठी आवक होत असल्याने निर्यात दरांनी लोणंदच्या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. लोणंद मार्केटमध्ये कांद्याचे भाव कमी झालेले दिसत आहे.
बाजार समितीत कांद्याच्या दरात एक नंबर सहाशे ते सातशे, दोन नंबर कांदा ४५० ते ६००, गोल्टी कांदा २५० ते ४५० पर्यंत निघाले होते. (वार्ताहर)