कांद्याला मिळतोय किलोला ३ पासून १६ रुपयांपर्यंत भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:51+5:302021-03-27T04:40:51+5:30
सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ...
सातारा : जिल्ह्यात साडेचार हजार रुपये क्विंटलवर पोहोचलेल्या कांद्याचा दर एकदमच गडगडला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ३०० पासून १५०० ते १६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर कोबी, टोमॅटोनंतर आता वांग्याचा दर एकदम खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ४०९ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील महिन्यापूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर एकदमच दर गडगडला.
सातारा बाजार समितीत गुरुवारी ४८ वाहनांतून ४५१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर बटाटा १०, लसूण २० आणि आल्याची १९ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला १० किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवरचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला १५० ते २०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आला. तर वांग्याला १० किलोला ८० ते १०० रुपये दर मिळाला. टोमॅटो ६० ते ८०, कोबीला २० ते ३० रुपये भाव आला. टोमॅटो व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर एकदमच कमी झाला आहे. तर फ्लॉवरला १० किलोला १०० ते १२० अन् दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.
बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला क्विंटलला २५०० पासून ३ हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला ३ हजारापर्यंत पर्यंत दर मिळाला. आले दरात सुधारणा झाली आहे. तर लसणाला क्विंटलला २ ते ४ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही कमी होऊ लागला आहे. वाटाण्याला ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटण्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. बाजारात अजूनही भाज्यांचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
चौकट :
मेथी, कोथींबीर दरात सुधारणा...
सातारा बाजार समितीत गुरुवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. मेथीच्या १७०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ७०० ते ८०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १२०० पेंडी आली. याला शेकडा दर ५०० ते ७०० रुपयांदरम्यान मिळाला. तर पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये दर आला.
......................................................