आॅनलाईनची सक्ती; तरीही पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:19 PM2017-09-25T23:19:56+5:302017-09-25T23:19:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : आपल्या सौंदर्याने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान पटकावलेल्या कास पठारावर फुलांचा रंगोत्सव सुरू झाला असून, हा अनोखा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांना आॅनलाईन बुकींगची सक्ती करण्यात आली आहे. असे असूनदेखील देश-विदेशातील पर्यटक कासला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. चालू हंगामात हजारो पर्यटकांनी पुष्पपठाराला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.
जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असून, देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने पठाराला भेटी देत आहेत. शनिवार, रविवार, सलग सुटीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रिमझिम पावसात भिजण्याबरोबरच पर्यटक कौटुंबिक सहलीचे क्षण कॅमेºयात टिपून ठेवत आहेत. पठारावरील बहुतांश फुलांना बहर आल्याने सर्वत्र रंगबिरंगी फुलांचे गालिचे पाहावयास मिळत आहेत. कास पठारासह कास तलावालाही अनेकजण भेटी देत आहेत.
अधूनमधून पावसाला सुरुवात होत असल्याने जलधारा अंगावर झेलत पर्यटक हिरवळीतून भटकंती करताना दिसत आहेत. पठारावर देखरेख व मार्गदर्शनासाठी वनविभागाचे कर्मचारी तसेच कास, कासाणी, आटाळी, एकीव, पाटेघर, कुसुंबिमुरा कार्यकारिणी समितीचे कर्मचारी, गाईड, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
या फुलांना बहर...
सध्या पठारावर कापरू, टूथब्रश, दीपकांडी, रान महुरी, सीतेची आसवे, रानवांगे, गेंद, चवर, कापरू, नीलिमा, अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी फुलांना चांगला बहर आला असून, गेंद, सीतेची आसवे, तेरडा मोठ्या या प्रमाणावर बहरला आहे. बहुतांशी ठिकाणी तेरड्याचे गालिचे सजले आहेत. यामुळे हा परिसर मनमोहक बनू लागला आहे.