ऑनलाईन शिक्षणाने बिघडवली हस्ताक्षरं अन् लिखाणाची गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:37 AM2021-03-25T04:37:04+5:302021-03-25T04:37:04+5:30

सातारा : कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतर त्याचे अनेक दुष्परिणाम पुढे येऊ लागले आहेत. ऑनलाईन अभ्यास करण्याच्या सवयीने विद्यार्थ्यांना भरभर लिहिण्याचा सराव ...

Online education spoils handwriting speed! | ऑनलाईन शिक्षणाने बिघडवली हस्ताक्षरं अन् लिखाणाची गती!

ऑनलाईन शिक्षणाने बिघडवली हस्ताक्षरं अन् लिखाणाची गती!

googlenewsNext

सातारा : कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतर त्याचे अनेक दुष्परिणाम पुढे येऊ लागले आहेत. ऑनलाईन अभ्यास करण्याच्या सवयीने विद्यार्थ्यांना भरभर लिहिण्याचा सराव मोडला आहे. परिणामी सराव परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या हातदुखीचं भलतंच संकट पालकांसह विद्यार्थ्यांसमोर येऊन ठेपलं आहे.

कोरोनाच्या धक्क्यात असतानाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन क्लासेसचा आधार घेण्यात आला. ऑनलाईन अध्यापनाचे प्रयोग पहिले काही महिने झाल्यानंतर त्याचा सराव झाला. त्यात सातत्य राहिल्याने पुढे हे वर्गच शाळेने सुरू ठेवले. ऑनलाईन शिकवणे आणि ऑफलाईन अभ्यास ग्रुपवर पाठवणे सुरू झाल्याने, दिवसभर घरीच असल्याने निवांत लिखाण करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली.

गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना लिखाणाला भरपूर वेळ मिळाल्याने हस्ताक्षर काढताना त्याला गतीची साथ आवश्यक आहे, याचाच विसर पडला. परिणामी अभ्यासाच्या तोंडावर ही समस्या पुढे आली आहे. दहावी, बारावीसह आठवी आणि नववीची वार्षिक परीक्षाही ऑफलाईन असल्याने ऐन परीक्षेत वेळ न पुरल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होऊ शकतो, अशी पालकांना भीती आहे.

दरम्यान, शाळेत आणि घरात अभ्यास करण्याच्या स्थितीमध्ये मोठी तफावत आढळते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यांच्यामते हाताचे काम करताना त्याला आधार मिळण्यासाठी वर्गात जसे बेंच असतात, तसे ते घरात असत नाहीत. दोन्ही पाय जमिनीवर टेकतील या पद्धतीने बसणे आणि दोन्ही हाताला आधार मिळेल, असा टेबल घेऊन लिखाण करायला बसला, तर हातदुखी कमी होऊन अक्षर सुधारायला मदत होऊ शकते, असेही ते मानतात.

लिखाणाची वेळ वाढली!

नियमित शाळा सुरू असताना वर्गात शिकविताना शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले तितक्याच गतीने वहीत टिपून घेण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली होती. गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्गात शिक्षक शिकवत होते आणि विद्यार्थी त्यांच्या सोयीने अभ्यास पूर्ण करत होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा वेग अगदीच मंदावला. वर्षभरात याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन परीक्षेच्या काळात हाताचं दुखणं वाढू लागलं आहे.

कोट :

गेल्या काही दिवसांत विद्यार्थी शंभर गुणांचा पेपर कसा सोडवणार, असे पालक विचारत आहेत. वर्षभरात लिखाणाची सवय मोडल्याने हा परिणाम झालाय. आम्ही विद्यार्थ्यांचे जादा तास घेऊन याचा सराव घेत आहोत.

- राजेंद्र चोरगे, संघटक, गुरुकुल स्कूल, सातारा

हे करणंही शक्य!

परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवणे

हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे

पेपर सोडवताना किंवा लिखाण करताना उंचीनुसार योग्य टेबल-खुर्चीचा वापर करणे

दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करणे

परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी लिहिणे

Web Title: Online education spoils handwriting speed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.