ऑनलाईन वर्गात पालकांची लुडबुड ठरतेय त्रासदायक, शिस्त पाळण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:49 PM2021-08-23T20:49:19+5:302021-08-23T20:58:49+5:30

Online Education : शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करताना पालकांची होणारी लुडबुड त्रासदायक ठरू लागली आहे.

online education teacher says Parents interfere in student study | ऑनलाईन वर्गात पालकांची लुडबुड ठरतेय त्रासदायक, शिस्त पाळण्याची गरज

ऑनलाईन वर्गात पालकांची लुडबुड ठरतेय त्रासदायक, शिस्त पाळण्याची गरज

Next

प्रगती जाधव-पाटील

सातारा : ऑनलाईन वर्ग सुरू झाल्यापासून अभ्यास करण्यासाठी आवश्यक वातावरण विद्यार्थ्यांना मिळालं नाही. त्यातच शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी करताना पालकांची होणारी लुडबुड त्रासदायक ठरू लागली आहे. अभ्यास येत नसलेल्या आपल्या पाल्याला दबक्या आवाजात उत्तर सांगणाऱ्या पालकांना खडेबोल सुनावण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

कोविड काळ सुरू झाल्यापासून मुलांना शाळेत जाण अवघड झाले आहे. बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे तर हालच वेगळे आहेत. वर्गात शिक्षक शिकवत असताना कुटूंंबियांच्या अन्य हालचालींकडे त्यांचे लक्ष वेधले जाते. परिणामी शिक्षक काय शिकवतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. शिक्षणाचा हा पायाच कच्चा राहिला तर पुढील शैक्षणिक डोलारा उभं राहणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे शिकवलेले मुलांना समजलं का? हे तपासायला मुलांना लिहायला, वाचायला किंवा सांगायला लावलं तर ती अडखळतात. यामुळे विद्यार्थ्याच्या आकलनाचा अंदाज शिक्षकांना येतो. मात्र, मुल अडखळत असताना पालकांनीच त्याला कॉपी पुरविल्यामुळे मुलंही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत नसल्याचेही आढळून आले आहे.

मुलं चुकत असतील तर चुकू द्या

ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ऑनलाईन वर्गात शिकवलेलं मुलांना समजलं का नाही हे तपासायला शिक्षक त्यांच्याकडून वाचन आणि पाठांतर करून घेतात. वाचनात अडथळे येऊ लागले की पालक विद्यार्थ्यांना सांगत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुलं चुकत असतील तर चुकू दे, त्यांना दुरूस्त करायला आम्ही आहोत, तुम्ही त्यांना कहाी सांगू नका असे वारंवार आवाहन पालकांना करण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे.

पालकांच्या उच्चाराने होतेय बोंब

पहिली ते चौथीच्या ऑनलाईन  वर्गात धडे वाचण्याचा सराव घेतला जातो. वर्गातील प्रत्येक मुलाने किमान एक परिच्छेद वाचावं अशी अपेक्षा असते. पालकांच्या मदतीने इंग्रजीतून धडे वाचताना विद्यार्थ्यांची अक्षरश: भंबेरी उडत आहे. इंग्रजी भाषेतील स्पष्ट उच्चार करण्याचा कटाक्ष शिक्षकांचा असतो तर शब्दाला शब्द जोडून इंग्रजी शब्द तयार करण्याचा प्रयत्न पालक करतात. त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेलं योग्य की पालकांनी सांगितलेलं असा गोंधळ विद्यार्थ्यांचा होतो.

‘मार्कस’वादी पालकांची डोकेदुखी

पाल्याला अभ्यासात चांगले गुण मिळावेत अशी मानसिकता असलेल्या ‘मार्कस’वादी पालकांनी तर मुलांचे पेपरही स्वत:च सोडविल्याचे समोर आले आहे. बहुपर्यायी प्रश्न उत्तर असणाºया चाचणी परिक्षांचे पेपर अवघ्या पाच मिनिटात सोडवून आल्याचे पाहिल्यानंतर शिक्षकांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला. यावर पर्याय म्हणून काही शाळांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे प्रश्नपत्रिका सोडविण्याचे दोन्ही पर्याय सक्तीचे केले. शाळेत गुणापेक्षा ज्ञान महत्वाचे असते याचेच प्रबोधन होणं आवश्यक बनलं आहे.

ऑनलाईन  वर्गात शिकवलेलं विद्यार्थ्यांना काहीच समजत नाही, असा पालकांचा शाळेवर आक्षेप असतो. पण आपलं मुल अडखळू लागलं की त्याचा अपमान होईल म्हणून पालक त्याच्या मदतीला धावतात हे गैर आहे. पाल्य चुकलं पाहिजे, अडखळलं पाहिजे त्याशिवाय ते शिकणार नाही, हे पालकांना समजणं आवश्यक आहे.

- विद्या धुमाळ, पालक

 

Web Title: online education teacher says Parents interfere in student study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.