चक्क रेड्यावर बसून दिली ऑनलाईन परीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:41 AM2021-05-20T04:41:55+5:302021-05-20T04:41:55+5:30
बामणोली : आतापर्यंत आपणा सर्वांना माहिती आहे की, यमदेव म्हणजे साक्षात मृत्यूदेव याचे वाहन रेडा. यमदेव रेड्यावरून येऊन मनुष्याचे ...
बामणोली : आतापर्यंत आपणा सर्वांना माहिती आहे की, यमदेव म्हणजे साक्षात मृत्यूदेव याचे वाहन रेडा. यमदेव रेड्यावरून येऊन मनुष्याचे प्राण घेतो. परंतु बामणोली परिसरातील अनेक कॉलेज युवक शहरातील कॉलेज बंद असल्यामुळे आपल्या खेडेगावी आलेले आहेत. काहींच्या ऑनलाईन परीक्षा सुरू झालेल्या आहेत. आपल्या मूळ खेडेगावी आल्यावर अनेकांना आपली जनावरे चारण्यासाठी उंच डोंगरात घेऊन जावे लागत आहे. परंतु जनावरे एकाच जागी थांबत नाहीत. ती सतत चाऱ्याच्या शोधात धावत फिरत असतात. अशावेळी जनावरे ही सांभाळायची व ऑनलाईन कॉलेजची परीक्षा कशी द्यायची? यावर उपाय म्हणून बामणोलीच्या शैलेश शांताराम गोरे या कॉलेज युवकाने चक्क रेड्यावर बसून ऑनलाईन परीक्षा दिली. रेडाही सुरक्षित, नेटवर्कही मिळाले व परीक्षाही पार पडली. या युवकाने एकाच प्रयत्नात सर्व साध्य केले. त्याच्या या असाधारण कौशल्याचे अनेकांनी उपयोजन करणे गरजेचे आहे. कारण सद्यस्थितीत पुस्तकी ज्ञान मिळवून त्याचा व्यवहारात उपयोग करणे हेही तितकेच गरजेचे आहे. तेव्हाच शिक्षणाचे खरे महत्त्व इतरांनाही समजणे गरजेचे व अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
१९बामणोली
बामणोली येथील शैलेश शांताराम गोरे या कॉलेज युवकाने चक्क रेड्यावर बसून ऑनलाईन परीक्षा दिली. (छाया : लक्ष्मण गोरे )