ऑनलाइन ग्रामसभा बहुतांशी तहकूब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:29 AM2021-06-01T04:29:36+5:302021-06-01T04:29:36+5:30
औंध : औंधसह परिसरात आज कोरोनामुळे प्रथमच ग्रामपंचायतींनी ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरम पूर्ण होत नसल्याने बहुतांशी ...
औंध : औंधसह परिसरात आज कोरोनामुळे प्रथमच ग्रामपंचायतींनी ऑनलाइन ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरम पूर्ण होत नसल्याने बहुतांशी ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या. त्यामुळे औंध परिसरात ऑनलाइन ग्रामसभेस अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात ऑनलाइन ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे संदेश सोशल मीडियावर देण्यात आले. झूम अॅपवरून कमीतकमी शंभर ग्रामस्थ कनेक्ट झाले तरच ग्रामसभा घेण्यात येईल, अन्यथा तहकूब करण्यात येणार असे त्या-त्या ग्रामविकास अधिकारी यांनी सूचना दिली. औंध, गोपूज, जायगाव, लोणी, भोसरे, नांदोशी, वाकळवाडी, पळशी, खरशिंगे यांसह अनेक गावांत कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली. औंधला २०, गोपूज ४७, लोणी ९, जायगाव ४८, भोसरे, २१ अशा प्रकारे प्रत्येक गावात ऑनलाइनवर येणाऱ्यांची संख्या असल्याने ग्रामसभा तहकूब करावी लागली.
अचानक दोन दिवसांत ग्रामसभा घेण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात तळागाळातील लोकांना ते नेमके समजले नाही, आता पुढे ढकललेल्या गावांनी गावोगावी याचे प्रबोधन करणे गरजेचे बनले आहे. बहुतांश लोकांना अॅपची माहिती नाही, त्याची जबाबदारी गावातील युवकांनी घेऊन कोरम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण गेली अनेक महिने ग्रामसभा नसल्याने गावच्या विकासाबाबत व अन्य धोरणे, शासकीय योजना याबाबत सर्वसामान्य ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात ऑनलाइन ग्रामसभांना किती प्रतिसाद मिळणार हे वेळच ठरविणार!