दाभोलकरांच्या पुस्तकाची आॅनलाईन विक्रमी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:37 PM2018-11-13T22:37:45+5:302018-11-13T22:37:51+5:30
सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या सुमन ओक अनुवादित इंग्रजी पुस्तकाची आॅनलाईनवर सर्वाधिक विक्री सुरू ...
सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या सुमन ओक अनुवादित इंग्रजी पुस्तकाची आॅनलाईनवर सर्वाधिक विक्री सुरू आहे. शशी थरूर यांच्या ‘दी पॅराडॉक्सिकल प्राईममिनिस्टर नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया’ या पुस्तकासोबत दाभोलकर यांच्या या अनुवादित पुस्तकाची विक्री सुरू आहे.
मूळत: मराठी भाषेतील तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सुमन ओक यांनी द केस फॉर रिजन-अंडरस्टँडिंग द अँटी सुपरस्टीशन मुव्हमेंट अशा नावाने केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आणि शास्त्रीय आधारावर मांडलेले विचार याचा या पुस्तकामध्ये समावेश आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाने विज्ञानाच्या आधारावर आपली विचारक्षमता विकसित केली पाहिजे. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या चळवळीबाबतची माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. दोन खंडामध्ये हे पुस्तक उपलब्ध असून, पहिल्या खंडामध्ये अंधश्रद्धा चळवळ समजून घेणे आणि तर्कवादी आंदोलनाची सैद्धांतिक मांडणी समजून घेता येते. तसेच अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले विविध प्रयोग समजून घेता येतात.
दाभोलकर यांची ईश्वराबाबतची संकल्पना आणि धर्माची भूमिका, वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच स्वतंत्र विचार आणि दृढ निश्चय कसा असावा, याबाबतची माहितीही या पुस्तकातून मिळते. विशेष म्हणजे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या शशी शरूर यांच्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी अँड हिज इंडिया या पुस्तकाच्या बरोबरीने दाभोलकर यांच्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाची विक्री सुरू आहे.
याबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा विनाशाय, भ्रम आणि निरास, मती-भानामती, लढे अंधश्रद्धेचे, तिमिरातून तेजाकडे, अंध:विश्वास उन्मूलन विचार, अंध:विश्वास उन्मूलन आचार, एैसे कैसे झाले भोंदू, ठरलं डोळस व्हायचंय, विचार तर कराल या पुस्तकांचीही आॅनलाईनवर मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.
इंग्रजी अनुवादित पुस्तकाला जगभरातूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रीवरून दिसून येत आहे.