आगाशिवनगर आदर्श विद्यालयाचे छंदवर्गांद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:03+5:302021-05-31T04:28:03+5:30

श्रीमळाई देवी शिक्षण संस्थेचा आदर्श उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मुलांचे मनोरंजनातून शिक्षण ही उक्ती सार्थ ठरवत ...

Online training through rhymes of Agashivanagar Adarsh Vidyalaya | आगाशिवनगर आदर्श विद्यालयाचे छंदवर्गांद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण

आगाशिवनगर आदर्श विद्यालयाचे छंदवर्गांद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण

Next

श्रीमळाई देवी शिक्षण संस्थेचा आदर्श उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : मुलांचे मनोरंजनातून शिक्षण ही उक्ती सार्थ ठरवत आगाशिवनगर आदर्श विद्यालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाही शिक्षण सुरू ठेवले आहे. यानुसार विद्यार्थ्यांचे छंद जोपासण्यासाठी मनोरंजनातून ज्ञान देऊन त्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. श्रीमळाई देवी शिक्षण संस्थेचा हा उपक्रम आदर्श असल्याची प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहे.

श्रीमळाई देवी शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. तसाच उपक्रम आगाशिवनगर आदर्श विद्यालयाने हाती घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असूनही शिक्षण सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांना छंद व कला जोपासणारे ऑनलाईन शिक्षण मनोरंजनातून दिले जात आहे. यामध्ये विद्यालयातील शिक्षकांनी चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तूनिर्मिती, सौंदर्य कृती, एरोबिक्स, वेदिक गणित, विज्ञानविषयक प्रयोग, मनोरंजनात्मक कोडी, बालगीत, मनोरंजन, गोष्टी, बोधकथा सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण अशा विविध कलांचे ऑनलाईन वर्ग सुरूच ठेवले आहेत. तसेच रफिक सुतार, वैभव शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगा अभ्यासाचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जात आहे. सोपान जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शब्द संस्कार, ऑनलाईन वक्तृत्व कौशल्य विकास प्रशिक्षण यासारख्या नाविन्यपूर्ण छंदवर्गांच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे काम सुरू ठेवले आहे. विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या सर्व छंदवर्गांना विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या काळातही शिक्षक व विद्यार्थी हे नाते घट्ट ठेवण्यासाठी असे उपक्रम उपयोगी पडतात. आगाशिवनगर आदर्श शाळेने कलात्मक वर्ग सुरू करून मनोरंजनातून शिक्षण दिले. हा उपक्रम आदर्शवत आहे, असे सांगताना संस्थेचे सचिव अशोकराव थोरात व संचालक मंडळाने विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Online training through rhymes of Agashivanagar Adarsh Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.