एक रुपयांत पीक विमा, तरी शेतकऱ्यांमध्ये उदासिनता; सातारा जिल्ह्यातील केवळ 'इतक्या'नीच उतरवला विमा
By नितीन काळेल | Published: July 19, 2023 06:15 PM2023-07-19T18:15:38+5:302023-07-19T18:19:58+5:30
विम्याबाबत शेतकऱ्यांत उदासिनताच दिसून येत आहे.
सातारा : राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून एक रुपयात पीक विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून ३१ जुलैपर्यंत भरता येणार आहे. पण, जिल्ह्यात ९ लाख शेतकरी असतानाही आतापर्यंत फक्त जवळपास १५ हजार शेतकऱ्यांनीच विमा भरलेला आहे. यामुळे विम्याबाबत शेतकऱ्यांत उदासिनताच दिसून येत आहे. तरीही गतवर्षीपेक्षा यंदा सहभाग वाढणार हे स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा. पण, राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. त्याची सध्या अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही एक रुपय भरुन पिकाचा विमा उतरवता येत आहे. यासाठी एकूण ९ पिकांचा समावेश आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद आणि कांदा या पिकांचा समावेश आहे.
कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार (हेक्टरी रुपयात)
पीक - भरपाई रक्कम
भात (तांदूळ) - ४१ हजार
ज्वारी - २० हजार
बाजरी - १८ हजार
नाचणी - २० हजार
भुईमूग - ४० हजार
सोयाबीन - ३२ हजार
मूग - २५,८१७ रुपये
उडीद - २६ हजार
पीक विमा नोंदणीसाठी कागदपत्रे...
शेतीचा सात-बारा उतारा, आठ अ उतारा, आधार कार्ड, बॅंक पासबूक, पीक पेराचे स्वयंघोघणापत्र, ई पीक पाहणी बंधनकारक. ही पीक विमा नोंदणी जिल्ह्यातील सीएससी केंद्रे, महा ई सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र तसेच राष्ट्रीयकृत बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंक त्याचबरोबर शेतकरी विमा संरक्षणासाठी वेब पोर्टलद्वारे थेट अर्ज करु शकतील.
आतापर्यंत पीक विमा उतरवलेले शेतकरी
तालुका - शेतकरी
जावळी - २२१
कऱ्हाड - १,६७१
खंडाळा - ४१७
खटाव - ३,१६१
कोरेगाव - ४८१
महाबळेश्वर - ११
माण - ४,४३४
पाटण - ६९०
फलटण - ९२०
सातारा - २,२६१
वाई - ५३६