जिल्ह्यात केवळ पाच बालरोग तज्ज्ञ असताना तिसरी लाट कशी रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:16+5:302021-06-03T04:27:16+5:30

सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त धोका हा बालकांना असल्याचे सांगण्यात येत असतानाच सातारा जिल्ह्यात ही लाट रोखण्यासाठी ...

With only five pediatricians in the district, how will the third wave be stopped? | जिल्ह्यात केवळ पाच बालरोग तज्ज्ञ असताना तिसरी लाट कशी रोखणार?

जिल्ह्यात केवळ पाच बालरोग तज्ज्ञ असताना तिसरी लाट कशी रोखणार?

Next

सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त धोका हा बालकांना असल्याचे सांगण्यात येत असतानाच सातारा जिल्ह्यात ही लाट रोखण्यासाठी केवळ पाच डॉक्टर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू आहे. ही लाट अद्याप ओसरली नसतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत प्रशासनाकडून दिले जात आहेत. या तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका हा बालकांना असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ किती आहेत, याचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली. जिल्ह्यात एकूण ७८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या एकाही केंद्रामध्ये बालरोगतज्ज्ञ नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जर तिसरी लाट फैलावली तर ती कशी आटोक्यात आणणार, असा मोठा प्रश्‍न प्रशासनासमोर आ वासून उभा आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये केवळ पाच बालरोगतज्ज्ञ आहेत. या पाच डॉक्टरांवरच सर्व अवलंबून असणार आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्यामुळे आरोग्य विभाग ही लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप तिसऱ्या लाटेचीच प्रशासनाकडून कसलीही तयारी झालेली पाहायला मिळत नाही. पण जर ही तिसरी लाट आली तर अचानक बालरोगतज्ज्ञ कोठून आणणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तिथले आरोग्य अधिकारी हेच बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. त्यामुळे स्वतंत्र बालरोगतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आलेली नाही. पण आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालरोगतज्ज्ञांची नेमणूक करावी लागणार आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य पालकांना उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच बालरोगतज्ज्ञांच्या नेमणुकीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चौकट : ग्रामीण भागातील स्थिती वाईट

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्याची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. या परिस्थितीशी प्रशासन दोन हात करत असतानाच आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. ग्रामीण भागामध्ये बालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागांमध्ये बालकांवर योग्य उपचार होण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची फौज प्रशासनाजवळ असणे गरजेचे आहे.

चौकट : स्वतंत्र वॉर्ड उभारण्याची गरज

जिल्ह्यात जर तिसरी लाट आली तर बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऐनवेळी जर धावाधाव करावी लागली तर मोठी हानी होऊ शकते, असेही काही डॉक्टरांनी खासगीत बोलताना सांगितले.

कोट:

सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यासाठी आमचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तिसरी लाट जरी आली तरी या लाटेला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आमची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. प्रशासनाकडून आणखी मनुष्यबळ मागवले जाईल.

- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा

...........

चौकट

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र - ७६

बालरोग तज्ज्ञ - ०

जिल्ह्यातील एकूण रुग्ण - १,६९,३१४

बरे झालेले रुग्ण - १,४३,२११

उपचार घेत असलेले रुग्ण- २०,०१७

१० वर्षेपेक्षा कमी वयाचे रुग्ण- ७,०३८

११ ते १८ वर्षे वयोगटातील रुग्ण - ११९५९

जिल्हा शासकीय रुग्णालय बालरोगतज्ज्ञ - ५

Web Title: With only five pediatricians in the district, how will the third wave be stopped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.