कऱ्हाड तालुक्यातील ३५ गावांत एकच गणपती!
By admin | Published: September 6, 2015 08:36 PM2015-09-06T20:36:22+5:302015-09-06T20:36:22+5:30
गावांनाही बक्षीस : आदर्श गणेश मंडळांचा पोलिसांकडून गौरव
कऱ्हाड : ‘गणेशोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना महत्त्व देऊन गणेश मंडळांनी कार्यक्रम राबवावेत. हा उत्सव चैतन्यमय वातावरणात होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. आदर्श गणेश मंडळांना पारितोषिक देण्याबरोबरच कऱ्हाड तालुक्यातील ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवणाऱ्या गावांनाही पोलीस दलाकडून बक्षीस देण्यात येणार आहे. तालुक्यात ३५ गावांत एक गणपती बसविण्यात येत आहे,’ अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली.
कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यांतर्गत आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तालुक्यात सुमारे ५८६ गणेश मंडळे आणि जवळपास ३५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात असून, गणेशोत्सव काळात मंडळांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले. अप्पासाहेब गायकवाड, रामभाऊ सातपुते, सदाशिव खटावकर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चंद्रसेन मंडळ प्रथम...
कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यांतर्गत घेण्यात आलेल्या आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत वसंतगडमधील चंद्रसेन गणेश मंडळाने प्रथम, तांबवेतील हनुमान गणेश मंडळाने द्वितीय, तुळसणच्या नेहरू युवा मंडळाने तृतीय, साकुर्डीतील बाल हनुमान गणेश मंडळ व टेंभूतील आगरकर गणेश मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.