महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारणार : प्रदीप विधाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:56+5:302021-04-12T04:36:56+5:30
पुसेगाव : ‘देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. ...
पुसेगाव : ‘देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी व विषमता दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या विचारांची खरी गरज आहे. त्याचबरोबर महात्मा फुलेंचे पुरोगामी विचारच समाजाला तारू शकतात,’ असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
कटगुण, ता. खटाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच उदय कदम, सुधीर गोरे, महेश गायकवाड, मनोज देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विधाते म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी समतेच्या तत्त्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरुष समानता, शिक्षणासाठी प्रयत्न केले. तसेच जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. महात्मा फुले हे पहिले शिवशाहीर होते. फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिल्यांदा शिवजयंती सुरू केली. कुटुंबाला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे फुले दांपत्याला समजल्यामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणाची मूहर्तमेढ रोवली. त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. समाजाचे प्रबोधन व शेतकरी वर्गाची उन्नती हे फुले यांच्या चळवळीचे प्रमुख अंग होते. त्यामुळेच आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे.
फोटो ओळ :
कटगुण, ता. खटाव येथे जिल्हा महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)