.. तरच पाटणला मंत्रिपद ! मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत : पक्षनिष्ठेपेक्षा मैत्रीचीच चर्चा अधिक रंगली..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:46 PM2018-03-30T22:46:06+5:302018-03-30T22:46:06+5:30
कऱ्हाड : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त काढल्याचे सुतोवाच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेत. त्यामुळे साहजिकच आता तरी सातारा जिल्ह्याला स्वत:चा पालकमंत्री
प्रमोद सुकरे ।
कऱ्हाड : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त काढल्याचे सुतोवाच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेत. त्यामुळे साहजिकच आता तरी सातारा जिल्ह्याला स्वत:चा पालकमंत्री मिळेल का? अशी चर्चा सुरू झालीय. पाटणला शंभूराज यांच्या रुपाने मंत्रिपद मिळू शकते, असा विश्वास अनेकजण व्यक्त करीत आहेत.
राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. मात्र सेना-भाजपला एकत्रित आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई या दोन्ही संसदपटूंनी कमी जास्त प्रमाणात भूमिका बजावलीय, हे मात्र खरे. यातील एकजण राज्याचा मुख्यमंत्री झाला; पण पाटणच्या सेनेच्या आमदारांचे भाग्य काही अजून उघडलेले दिसत नाही.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांच्या रुपाने सातारा जिल्ह्यात भाजपची पताका फडकत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेवेळीच देसार्इंनाही मंत्रिपदाची लॉटरी लागेल, अशी अनेकांची धारणा होती. मात्र, तसे काही घडल्याचे दिसत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा करून घेत देसार्इंनी मतदारसंघात कोट्यवधीची विकासकामे खेचून आणलीत, हे मात्र खरे. मात्र, शंभूराज मंत्रिमंडळात नाहीत, याची सल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे.
संसदपट्टू म्हणून ओळख असणारे शंभूराज देसाई यांना राजकीय वारसा तर आहेच. मात्र, त्याबरोबर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख कामातून केली आहे. याचा फायदा सेनेलाही होणार आहे. त्यांना मंत्रिपद दिले तर सातारा जिल्ह्यात सेनेला बळकटी मिळू शकते. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांना ताकद मिळणे गरजेचे आहे. अलीकडच्या काही वर्षांत सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शंभूराज देसाई यांचे संबंधही बरेच दृढ झाल्याचे बोलले जाते. त्याचा फायदा मंत्रिमंडळ विस्तारात देसार्इंना होईल का? हे पाहावे लागेल.
शंभूराज देसाई यांनी सेनेत प्रवेश केला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: मरळी येथे येऊन त्याच कार्यक्रमात देसार्इंना सहकार परिषदेचे अध्यक्षपद व लाल दिव्याची गाडीही थेट दिली होती. आता सातारा जिल्ह्यात सेनेचा भगवा फडकविणाºया देसार्इंना उद्धव ठाकरे मंत्रिपदाची भेट देणार का? हे पाहावे लागेल.
...तरच संधी शक्य
जागा वाटपानुसार भाजपकडे तीस तर शिवसेनेकडे बारा मंत्रिपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तपासताना त्यात एखादा नापास झाला तरच सेनेकडून नव्याना संधी मिळू शकते.
फडणवीसांची मैत्री फळाला येणार का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे आमदार शंभूराज देसाई यांची मैत्री सर्वश्रूत आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांचे पाटण दौरे अन् तालुक्याच्या विकासाला मिळणारा भरघोस निधीही सध्या भलताच चर्चेत आहे. मंत्रिपद मिळण्यासाठी फडणवीसांची ही मैत्री फळाला येणार का? हे पाहावे लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र, आमच्या दोघांचा पक्ष वेगळा आहे. माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा का होतात? हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला कधीही भाजप प्रवेशाची आॅफर दिलेली नाही.
- आमदार शंभूराज देसाई
शिवसेना, पाटण