केवळ तीनच महिन्यांत तलाव आटले! नांदलमध्ये पाणीबाणी : धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 06:47 PM2018-08-22T18:47:49+5:302018-08-22T18:48:19+5:30
नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट
मलटण : नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
माणमधील टाकेवाडी, भांडवली या गावांची यशोगाथा पाहिल्यानंतर नांदलसारख्या गावावर पाण्याचे संकट येणे ही खेदाची बाब आहे. या ठिकाणी कमिन्स इंडिया कंपनीमार्फत तब्बल आठ बंधाऱ्यांची निर्मिती केली गेली. दरवर्षी असणारी दुष्काळसदृश्य परिस्थिती काही प्रमाणात कमी झाली. गावातील तब्बल आठ बंधारे काठोकाठ भरले. गावकºयांनी आनंदोत्सव साजरा केला; केवळ तीनच महिन्यांत या आनंदावर विरजन पडले.
जूननंतर गावातील शेतकºयांनी अनेक प्रकारची पिके घेतली. उसाचे मळेही दिसू लागले; पण जूननंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बंधाºयातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदलकरांमध्ये कभी खुशी कभी गम, अशीच अवस्था झाली आहे.
गावातील विहिरींची पाणीपातळी खलावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी खरिपाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली. काही शेतकºयांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागणी केल्या; पण आॅगस्ट संपता-संपता पाणी पातळी एकदम खालावली. त्यामुळे त्वरित उपाययोजना करत धोम-बलकवडीचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नांदल, सुरवडी, मुळीकवाडी ग्रामस्थांमधून होत आहे.
पाणी तलावांमध्ये सोडल्यास पाणी संकट दूर होईल..
धोम-बलकवडीच्या कॅनॉलमधून पाणी सोडून फलटण तालुक्यातील मुळीकवाडी, हिंगणगाव, धुमाळवाडी, कुरवली येथील धरणात सोडण्यात येऊ शकते. सध्या धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीला पाणी सोडून देण्यापेक्षा ते छोट्या-छोट्या धरण व तलावांमध्ये सोडल्यास गावांचे पाणी संकट दूर होईल.
मुळीकवाडी तलावात धोम-बलकवडी कॅनॉलचे पाणी सोडून नांदल, सुरवडीमधील बंधारे भरण्यात यावे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
-महादेव मोहिते, सरपंच, नांदल