राखीव मतदारसंघावर तीन तालुक्यांचाच दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:42+5:302021-09-08T04:47:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा, कऱ्हाड आणि फलटण तालुक्यांचे मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा बँकेच्या राखीव मतदारसंघांवर या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा, कऱ्हाड आणि फलटण तालुक्यांचे मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हा बँकेच्या राखीव मतदारसंघांवर या तीन तालुक्यांतील नेते दावा सांगू शकतात. या मतदारसंघातील उमेदवारीवरून मोठी धुसफूस होण्याची शक्यता आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी एकूण १ हजार ९६३ मतदान आहे. यावर्षी तब्बल ३०७ मतदान कमी झाले आहे. उर्वरित मतदानामध्ये सातारा सर्वाधिक ४१६, कऱ्हाड ३३२ तर फलटणचे २८० मतदान आहे. त्याखालोखाल पाटणचे मतदान आहे. साहजिकच महिला राखीव, भटक्या विमुक्त जाती व ओबीसी या राखीव मतदारसंघांवर जास्त मतदान असलेल्या तालुक्यातील नेते दावे सांगू शकतात. आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी या तीन तालुक्यांतील नेते आग्रही राहणार आहेत.
जिल्हा बँकेसाठी २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये विकास सेवा सोसायटी ११, खरेदी-विक्री संघ १, नागरी बँका पतसंस्था १, औद्योगिक विणकर १, कृषी प्रक्रिया १, गृहनिर्माण १, अनुसूचित जाती १, इतर मागास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती १ व राखीव महिलांमधून २ संचालक निवडले जाणार आहेत. महिला, भटक्या जमाती, अनुसूचित जाती व इतर मागास या मतदारसंघासाठी सर्वच मतदार मतदान करणार असल्याने सातारा, कऱ्हाड आणि फलटण तालुक्यातील मतदान या मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार आहे.
चौकट..
असे आहे मतदान...
नागरी सहकारी बँक ३७४
औद्योगिक विणकर ३७२
गृहनिर्माण व दूध ३७२
कृषी व प्रक्रिया २७
खरेदी-विक्री संघ ११
तालुकानिहाय मतदान
सातारा ४१६, कऱ्हाड ३३२, फलटण २८०, पाटण २१४, खटाव १५०, कोरेगाव १३१, माण ११५, वाई १३२, जावळी ६९, खंडाळा ८८, महाबळेश्वर ४२
निवडणुकीबाबत आज फैसला...
जिल्हा बँकांची निवडणूक प्रचलित सहकार कायद्यानुसार घ्यायची की रिझर्व्ह बँकेने केलेल्या नवीन कायद्यानुसार, याबाबत अनिश्चितता आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होणार आहे. इतर निर्णयांसोबतच निवडणुकीबाबतही चर्चेतून निर्णय होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत १२ आक्षेप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार कार्यालयात कच्ची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर दि. ३ सप्टेंबरपासून आक्षेप मागविण्यात येत आहेत. कोल्हापूर येथील सहनिबंधक कार्यालयामध्ये मंगळवारी दि. ७ रोजी २ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मयताचे नाव असलेल्यांबाबत ८, यादीत नाव नसल्याबाबत १, राजीनामा देऊनही यादीत नाव असल्याबाबत १, प्रतिनिधींच्या नावावर आक्षेपाबाबत १ तर निवडणूक झाल्यानंतरही जुन्या संचालकाचे यादीत नाव आल्याबाबत १ अशा आत्तापर्यंत १२ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.