‘कास’चा पहिला व्हॉल्व्ह उघडा; साठा १७ फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:22+5:302021-01-20T04:39:22+5:30
पेट्री : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होऊ लागली असून, पाणीसाठा सतरा फुटांवर ...
पेट्री : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होऊ लागली असून, पाणीसाठा सतरा फुटांवर आला आहे. त्यामुळे शहराला मंगळवारपासून दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावातील पाणीसाठा पंचवीस फुटांपर्यंत येतो. तलावातून शहराला दररोज साडेपाच लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पहिला व्हॉल्व्ह उघडा पडला होता. यंदा दहा ते पंधरा दिवस अगोदर पहिला व्हॉल्व्ह उघडा पडला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा एक फुटाने कमी आहे.
पहिल्या व्हॉल्व्हमधून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने सातारा शहराला दुसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे दर दिवसाला तलावातील पाणी पातळी एक इंचाने कमी होत आहे. हा पाणीसाठा पावसापर्यंत टिकून राहावा, यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.
फोटो : 19 सागर चव्हाण
सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह यंदा जानेवारी महिन्यातच उघडा पडला आहे. (छाया :सागर चव्हाण)