विखुरलेल्या स्मृतिशिळातून उभे राहील खुले संग्रहालय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:40 AM2021-05-18T04:40:59+5:302021-05-18T04:40:59+5:30
सातारा : सातारा जिल्ह्याला येथील प्रत्येक गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ठिकठिकाणी आढळणारी पुरातन मंदिरे, तळी हौद या वस्तू ...
सातारा : सातारा जिल्ह्याला येथील प्रत्येक गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ठिकठिकाणी आढळणारी पुरातन मंदिरे, तळी हौद या वस्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. मात्र याहूनही पुरातन असलेल्या स्मृतिशिळा आपल्या अवतीभवती विखरून पडल्या असताना आपण त्याचे महत्त्व जाणत नाही. या स्मृतिशिळांचे जतन करण्यासाठी जर आपण पुढाकार घेतला तर आपल्या गावाला नवी ओळख मिळेल शिवाय ऐतिहासिक वस्तूंचे खुले संग्रहालयदेखील उभे राहील.
वस्तू संग्रहालय म्हणजे केवळ जुन्या-पुराण्या वस्तूची भांडारे नसून ती अनौपचारिक शिक्षण देणारी विद्यापीठे आहेत. या संग्रहालयाचा पर्यायाने आपल्या इतिहास, संस्कृती विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १८ मे हा दिवस संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय तसेच औंध येथे भवानी वस्तू संग्रहालय अशी नामांकित दोन संग्रहालये आहेत. सातारच्या इतिहासाचे संरक्षक म्हणून या संग्रहालयांकडे आपण पाहतो. गेल्या तीन शतकांमधील महत्त्वाच्या अशा अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु याहूनही बराचसा इतिहास सातारच्या भूमीवर इथे-तिथे वादळवाऱ्याची अन् ऊन-पावसाची तमा न बाळगता पडलेला दिसतो. यामध्ये चालुक्यकालीन मंदिर असतील, वीरगळ, मराठाकालीन वाडे असतील, नद्यांचे घाट असतील किंवा सर्वसामान्य माणसांच्या घरांमध्ये वापरले जाणारे अनेक ऐतिहासिक ऐवज असतील. अर्थात हा ऐतिहासिक वारसा पुरेशा काळजीनं आपण वाचवताना दिसत नाही. या ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकायला हवं. आपल्या अवतीभवती विखरून पडलेल्या हा वारसा संकलित केल्यास आपल्या गावात एक खुले संग्रहालय उभे राहू शकते. शिवाय आपल्या गावालादेखील एक वेगळी ओळख मिळू शकते. वाई तालुक्यातील किकली हे गाव वीरगळाचं यांचं गाव म्हणून नावारूपास येत असतानाच आता परळी ग्रामस्थांनीदेखील स्मृतिशिळांचे खुले संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. आपणही हा ऐतिहासिक ठेवा जतन केला, त्याचे संवर्धन केले तरच खऱ्या अर्थाने संग्रहालय दिन साजरा होईल.
(चौकट)
परळी ग्रामस्थांचे एक पाऊल पुढे..
सज्जनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या परळी गावास फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या गावातील प्राचीन मंदिरे, पुष्कर्णी, स्मृतिशिळा यांचा विचार करता हे गाव सुमारे हजार-बाराशे वर्षांपासून नांदते आहे, याची प्रचिती येते. या गावातील महादेव मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काही स्मृतिशिळा दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या होत्या. साताऱ्यातील जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेने गेल्या काही वर्षापासून या स्मृतिशिळांचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून त्यांच्या सवर्धनाबाबत आग्रही भूमिका घेतली होती. लॉकडाऊनच्या काळात परळीतील काही तरुणांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून शेकडो वर्षांपासून मातीत गाडलेल्या काही स्मृतिशिळा उजेडात आल्या. महत्त्वाचे म्हणजे जिज्ञासा संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेला दुर्मिळात दुर्मिळ असा रणयंत्राचे चित्रण असलेला वीरगळदेखील येथेच आढळला. परळी ग्रामस्थांनी याच ठिकाणी स्मृतिशिळांचे खुले संग्रहालय उभारण्याचा निर्धार केला असून, पुरातत्व विभागानेदेखील सकारात्मकता दर्शविली आहे.
लोगो : जागतिक संग्रहालय दिन विशेष
फोटो : मेल / संग्रहालय दिन नावाने