उघडलं पुस्तक की बोलतोय पेन..!
By Admin | Published: June 27, 2016 11:21 PM2016-06-27T23:21:22+5:302016-06-28T00:37:39+5:30
बचपन स्कूल ‘हायटेक’ : सर्व शैक्षणिक साहित्याची शाळेतच निर्मिती -- अशी ही जगावेगळी शाळा
माणिक डोंगरे -- मलकापूर -कोयना वसाहत बचपन प्ले स्कूल व अॅकॅडमिक हाईटस्मध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पुस्तक व पेन पुरविण्यात आले आहेत. पुस्तक उघडून त्यावर पेन ठेवला असता संपूर्ण पाठ पेनच बोलत असल्याने हा उपक्रम वैशिष्ठ्यपूर्ण ठरत आहे.
कोयना वसाहत येथे बचपन प्ले हाऊस व अॅकॅडमी हाईटस् स्कूलमध्ये तब्बल ९०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त २६ खोल्यांमधून प्रशिक्षित शिक्षकांकडून ज्ञानदानाचे काम करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी ११ स्कूलबसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या शाळेत लागणारे सर्व साहित्य शाळेतच निर्माण केले जाते. आॅडीव्हिज्यूअल डिजिटल क्लासरूम सॉफ्टवेअरमार्फत ई-लर्निंगचे शिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर केवळ बचपनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता खास नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. बोलके पुस्तक व पेनची निर्मिती करण्यात आली आहे. एखाद्या गोष्टीच्या हेडिंगवर तो पेन ठेवला असता तो पेन संपूर्ण गोष्ट सांगतो. त्या पेनास मोबाईल तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, त्या पेनास होमथिएटर जोडण्याची सुविधा आहे.
मिनी किचनची सोय
शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण गरम करण्यासाठी शाळेतच मिनती किचनची सुविधा करण्यात आली आहे. डब्यात इतर फास्टफूड आणण्यास बंदी घातली असून, केवळ फळे व पोळी-भाज्याच डब्यात देण्यात येतात.
पालकांनाही आयकार्ड
विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाते. मात्र, बचपन शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ओळखपत्र देण्यात आले आहे. ओळखपत्र बघूनच पाल्याला पालकाकडे दिले जाते.
केवळ ५ वर्षांत शाळेने कऱ्हाड तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्तेच्या जोरावर शाळेला विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर आयएसओ २००८ मानांकन प्राप्त झाले आहे.
- संजय जाधव, संचालक