पहिल्याच पावसात पोल खोल.. .. रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:02 PM2017-07-22T14:02:10+5:302017-07-22T14:02:10+5:30
वाईकरांचा सवाल : ठिकठिकाणचे रस्ते उखडले; वाहनधारक त्रस्त
आॅनलाईन लोकमत
वाई (जि. सातारा), दि. २२ : काही दिवसांपासून वाई तालुक्यात पावसाने समाधानकारक सुरुवात केली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु मुसळधार पावसाने तालुक्यातील मुख्य रस्ते पूर्णपणे उखडले असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसात पोल खोल... रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल, अशी प्रतिक्रिया नागरिक तसेच वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर, पाचगणी व वाई तालुक्यांतील शेकडो वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या वाई शहराला दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरात दररोज हजारो वाहनांची महाबळेश्वर, सातारा पुणेकडे ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत पहिल्याच पावसात शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शहरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. कित्येक ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्त्यात खोदकाम केल्याने त्याठिकाणी खड्डे नव्हे तर स्वयंघोषित गतिरोधक तयार होत आहेत. एकाच पावसाने रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्याने रस्त्याच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे पाहिल्यानंतर ह्यपहिल्याच पावसात पोल खोल... रस्त्याचे खड्डे कसे गोल गोल,ह्ण अशीच प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कामाचा दर्जा टिकवावा
ठेकेदाराने रस्त्यासाठी अतिशय हीन दजार्चे मटेरीयल वापरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तरी बांधकाम विभागाने लोकांच्या जीवाशी खेळ न खेळता रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राहील याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
अपघातांचे प्रमाण वाढले
तालुक्यातील वाई ते पाचगणी, वाई ते सुरूर, वाई ते पाचवड, वाई ते ओझर्डे तसेच पुढे शिरगाव घाटापर्यंत, गंगापुरी ते शेलारवाडी, वाई ते पसरणी, गोळेवाडी, पश्चिम भागातील संपूर्ण रिंगरोड एकाही खड्ड्याविना उरलेला नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.
बांधकामकडून दुरुस्तीस प्रारंभ
बांधकाम विभागाने भरपावसात रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने कामाचा दर्जा योग्य राहील की नाही? हाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी पाऊस उघडण्याची वाट पाहावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.