कोयना परिसरात पावसाची उघडीप, माणच्या पश्चिम भागात हजेरी : पेरणीच्या कामाला वेग येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:32 PM2018-06-20T12:32:28+5:302018-06-20T12:32:28+5:30
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.
सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.
जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली असलीतरी पावसाचे प्रमाण अनिश्चित स्वरुपाचे आहे. कधी पश्चिम भागात पाऊस पडतो. तर कधी दुष्काळी भागात पावसाची हजेरी लागते. तसेच जिल्ह्यातील धरणात अद्यापपर्यंत आवक झाली नाही.
दोन दिवस कोयना परिसरात पावसाने जोर धरला. मात्र, त्यानंतर आता पूर्णपणे उघडीप दिली आहे. इतर धरणक्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण साठ्यात वाढ झालेली नाही.
कोयना परिसरात बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत काहीच पाऊस झालेला नाही. तर मंगळवारी सायंकाळी माण तालुक्यातील पश्चिम भागात कळसकरवाडी, कुळकजाई, शिंदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. वॉटर कप स्पर्धेत काम केलेल्या जलसंधारणाच्या ठिकाणी पाणी साठले आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस
धोम ०४ (५७)
कोयना ०० (३१०)
बलकवडी ०५ (१५३)
कण्हेर ०० (३४)
उरमोडी ०० (४३)
तारळी ०० (८३)