सरकारचे खरे रुप जनतेसमोर उघड
By Admin | Published: July 3, 2015 09:51 PM2015-07-03T21:51:01+5:302015-07-04T00:03:09+5:30
चव्हाण : मसूरला मेळावा; बाजार समितीची निवडणूक आघाडीतून लढण्याचे दिले संकेत
मसूर : सोशल मीडियाचा वापर करून सत्तेवर आलेल्यो भाजपा सरकारचे खरे रूप जनतेपुढे येऊ लागले आहे. हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार चालला असून, केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या बनावट पदव्या व बाहेर पडत असलेले विविध घोटाळ्यांचे आरोप होऊन अठरा दिवस उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही ‘ब्र’ शब्द काढला नाही.
माझ्या पक्षातील मंत्री दोषी नाहीत, हे म्हणण्याची ताकद मोदींच्याकडे नाही, हे मोठे दुर्दैव आहे. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीने गत पाच वर्षांत उत्कृष्ट कारभार केला असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत आघाडी होणार असल्याचे संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
मसूर, ता. कऱ्हाड येथे कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी आमदार आनंदराव पाटील, कऱ्हाड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश नलवडे, धैर्यशील कदम, नंदकुमार डुबल, बाळासाहेब साळुंखे, मारुती जाधव, सुनील पाटील, जितेंद्र भोसले, अमित जाधव, सुदाम दीक्षित, डॉ. शंकरराव पवार, प्रतिभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारमध्ये पदवी चोरणारी माणसे मंत्रिमंडळात असून, खुद्द शिक्षणमंत्र्यांचीच पदवी बनावट आहे. हे मोठे दुर्भाग्य आहे. परदेशातून काळा पैसा देशात आणू, असे म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारने एकवीस हजार कोटींचा देशद्रोह केलेल्यांना पाठिंबा देत मौन का पाळले आहे. सोळा महिन्यांत सोळा देशांना भेटी देणारे मोदी हे पहिले पतंप्रधान आहेत. देशातील माल निर्यात करायचा सोडून बाहेरचे उद्योग आयात करून भारतातील उद्योगपतींना देशोधडीला लावण्याचा उद्योग सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा सात देशाला भेट देऊन आले. शिक्षणंमत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या शपथ पत्रात पदवी लिहिली आहे. त्यांनी बारावीनंतर कोणता तरी कोर्स मान्यता नसलेल्या संस्थेतून केला आहे.
सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. कऱ्हाड बाजार समितीचे पाच वर्षांत चांगला कारभार केला आहे. निवडणुकीसंदर्भात योग्य ती निर्णय घेतला जाईल. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, मरगळ झटकून निवडणुकांना ताकदीने समोर जावा,’ असे आवाहन केले.
यावेळी आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, सुरेश घोलप, जितेंद्र भोसले, जयसिंग जाधव, वसंत पवार, यांची भाषणे झाली. गोल्डन पवार यांनी सूत्रसंचालन केले. उमेश साळुंखे यांनी आभार मानले. मेळाव्यास कऱ्हाड उत्तरमधील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत
चुकीच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. ऊस तसेच दूध उत्पादक व दुष्काळग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा केवळ अश्वासनच ठरले आहे. ऊस व दूध उत्पादक हवालदिल झाले आहेत. ई-टेंडरमधून पारदर्शकता येत आहे, तरी ही ई-टेंडरशिवाय २०६ कोटींची खरेदी कशी झाली याचे स्पष्टीकरण दिले नाही. असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.