फलटणमध्ये पोलीस प्रशासनाकडून संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:40+5:302021-04-16T04:40:40+5:30
फलटण : शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिला दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पहावयास मिळाले. संचारबंदी ...
फलटण : शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिला दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पहावयास मिळाले. संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाचे नियमांची अंमलबजावणीबाबत आवाहन करण्यात आले.
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. यामुळे एकप्रकारे राज्यात लॉकडाऊन लागू झाला आहे. संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीसुद्धा फलटण शहरात न येणे पसंत केले होते. शंकर मार्केट, सुपर मार्केटमध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला होता. मॉर्निंग वॉकसाठी विमानतळावर आलेल्या नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावले. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने चोरमार्गाने सुरू असल्याचे दिसत होते.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे अनुषंगाने पोलीस प्रशासन महसूल व नगरपालिका यांच्यातर्फे संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाचे नियमांची अंमलबजावणी बाबत आवाहन केले. महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, महावीर स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रविवार पेठ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक या मार्गावर पोलिसांनी संचलन केले. यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महसूल, पोलीस व नगरपालिका कर्मचारी संचलनात सहभागी झालेले होते.