नगराध्यक्षपदासाठी २0 प्रभागांना संधी!
By admin | Published: July 7, 2016 11:18 PM2016-07-07T23:18:34+5:302016-07-08T01:06:21+5:30
खुले आरक्षण : काट्याची टक्कर पाहायला मिळणार--सातारा पालिकेतून
सातारा : साताऱ्याचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. अडीच वर्षांच्या आरक्षणाच्या आधारावर निघालेली ही सोडत कायम ठेवल्यास सलग पाच वर्षे एकच व्यक्ती नगराध्यक्षपदावर राहणार आहे. शहरातील २0 प्रभागांतून कोणीही व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभा राहू शकतो, संपूर्ण शहरातून संबंधिताला मतदान होऊन कोण किती पाण्यात आहे, हे कळू शकेल.
आगामी नगरपालिका निवडणुकीत २० प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण ४० नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग क्र. २ हा अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. प्रभाग ६ हा इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १० इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला या पदांसाठी राखीव आहेत.
खुल्या प्रवर्गातून १३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. या १३ जागांवर संधी मिळण्यासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू झाले आहे. यामध्येही निवडणुका मनोमिलनाच्या माध्यमातून झाल्यास सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी या दोन आघाड्यांमध्ये तेरा पदांचे वाटप करावे लागणार आहे.
नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडायचा असता तर प्रभाग क्रमांक २, ६, ७, ९, १०, १३, १४ या प्रभागांतील आरक्षित पदांवर निवडून आलेल्या नगरसेवकांना नगराध्यक्षपदावर संधी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यातूनही आघाडी प्रमुखांनी ठरविल्यास आरक्षित उमेदवारांना हे पद मिळू शकले असत; परंतु खुल्या गटातील उमेदवारांचा रोष पत्करावा लागला असता. आरक्षण बदलले गेले तर मात्र ठराविक प्रवर्गाच्या व्यक्तिला नगराध्यक्षपद मिळू शकते.
शहरातील प्रभाग ५, ६, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २० या प्रभागांमध्ये दलित नेतृत्वच अस्तित्वात राहणार नाही. दलित नेतृत्वाला शहराच्या सर्वच भागांतून समान संधी दिली जाणार नाही, हे हे जरी खरे असले तरी नगराध्यक्षपदावर त्यांना संधी मिळू शकणार आहे. संपूर्ण शहरावर प्रभाव असणारा व्यक्तीच नगराध्यक्ष बनणार आहे. (प्रतिनिधी)