सातारा पंचायत समिती : सभापतीपदाची अंबवडे, किडगाव गणांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 12:19 PM2019-12-12T12:19:36+5:302019-12-12T12:21:04+5:30
सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
सागर गुजर
सातारा : सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
सातारा पंचायत समितीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाच्या बहुमताची सत्ता आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले (पूर्वीची राष्ट्रवादी) यांच्या गटाचे ११, उदयनराजे भोसले यांच्या गटाचे ८ आणि भाजपचा १ असे पंचायत समितीमध्ये बलाबल आहे. सातारा, कोरेगाव आणि कºहाड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषदेचे १0 गट आणि पंचायत समितीचे २0 गण विभागले आहेत. तरी देखील शिवेंद्रसिंहराजे ठरवतील त्याच महिलेला सभापतीपदाची संधी मिळणार आहे.
सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण असल्याने विद्या देवरे (अंबवडे गण), सरिता इंदलकर (किडगाव गण), कांचन काळंगे (वर्णे गण) आणि बेबीताई जाधव (अतित गण) या चौघींपैकी एकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले संधी देऊ शकतात. सभापती निवड करत असताना बाबाराजे विधानसभा मतदारसंघ बळकटीच्या दृष्टिने विचार करतात की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बळ वाढविण्याच्या उद्देशाने वेगळे पाऊल उचलतात, हे पुढील काही काळात समोर येईल.
बेबीताई जाधव यांचा गण हा कºहाड उत्तर मतदारसंघात येतो. तर कांचन काळंगे यांचा गण काही प्रमाणात कºहाड उत्तर आणि काही प्रमाणात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तर विद्या देवरे आणि सरिता इंदलकर यांचे गण हे सातारा विधानसभा मतदारसंघात येतात. या दोन गणांमध्ये ताकद वाढविण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे प्रयत्न करणार आहेत.
जावळी तालुक्यातील राजकीय संघर्ष वाढू लागला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विरोधक जावळीत एकवटले आहेत. आगामी काळात जावळी तालुक्यातून विरोध वाढू लागला तरी त्याचा विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परळी खोऱ्यात ताकद वाढविण्यासाठी बाबाराजे विद्या देवरे यांना सभापतीपद देऊ शकतात.
तसेच उपसभापतीपद हे लिंब जिल्हा परिषद गटातील जितेंद्र सावंत यांच्याकडे असल्याने राजकीय समतोल राखताना सरिता इंदलकर यांचा सभापतीपदासाठी विचार होईल का? हाही प्रश्न पुढे येतो. सध्याच्या घडीला शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचा विचार करुनच निर्णय घेतील, असे बोलले जात आहे.
साताºयात संघर्ष अटळ
सातारा आणि जावळी पंचायतींमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्व मानणारे सदस्य निवडून आले आहेत. सदस्य पक्ष चिन्हांवर निवडून आले असले तरी त्यांच्यावर दोन्ही नेत्यांच्या विचारांचा पगडा आहे. जावळीत राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आहे. तर सातारा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे निवडून आलेले ११ सदस्य आहेत. आता दोन नेत्यांचे दोन गट तयार झाल्याने पंचायत समिती सभापती निवडीत प्रत्येकजण आपले प्यादे पुढे सरकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत सभापती निवडताना गटातटाचे राजकारण उफाळणार आहे.
मन नेत्यापाशी; तन निवडून आलेल्या पक्षात
पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी व काँगे्रसच्या चिन्हांवर निवडून गेलेल्या सदस्यांच्या नेत्यांनी पक्ष बदलले आहेत. नेते पक्षाबाहेर पडले असले तरी तांत्रिक अडचणींमुळे अनेक सदस्यांना पक्ष सोडता आले नाहीत. त्यांचे मन नेत्यांसोबत आणि तन मात्र निवडून आलेल्या पक्षात असल्याचे चित्र सध्या पहायला मिळते आहे.