मोर्चातील अ‍ॅट्रॉसिटी मागणीला विरोध

By admin | Published: September 17, 2016 10:26 PM2016-09-17T22:26:20+5:302016-09-18T00:06:05+5:30

समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय : वेळप्रसंगी विरोधात ठामपणे उभे राहणार

Opposition to the Atrocity demand for the rally | मोर्चातील अ‍ॅट्रॉसिटी मागणीला विरोध

मोर्चातील अ‍ॅट्रॉसिटी मागणीला विरोध

Next

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन हितांच्या विचारांचे आणि बहुजनांचे पालक होते. त्यामुळे छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जातीयवाद्यांना थारा दिला जाणार नाही. हिंदू कोड बिल आणि मंडल आयोगाला विरोध व कोपर्डीचा भावनिक विषय करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला विरोध करणाऱ्या जातीय मानसिकता असणाऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा निघत आहे. एकजातीय मराठा क्रांती मोर्चास आमचा विरोधच राहणार आहे,’ असे स्पष्ट मत चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले.
सातारा येथे समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अशोक गायकवाड, भगवान अवघडे, अमर गायकवाड यांच्यासह पुरोगामी पक्ष संघटनांचे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
खंडाईत म्हणाले, ‘कुणबी मराठा समाज्याच्या मागणीला कोणाचा विरोध नाही. औरंगाबादसह इतर ठिकाणी आरक्षणासोबतच पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, ही मागणी करण्यात आली आहे. बहुजन मराठा समाज आहे त्यांना कुणबी म्हणून शासन स्तरावर आरक्षण दिले. त्यासंबंधी कोणत्या राजकारण्यांनी राजकारण केले, या सगळ्या गोष्टी अलिप्त ठेवून जातीयवादाचे बीज पेरले जात आहे.’ ‘त्याचवेळी जातीवाद करणाऱ्यांना आमचा कडाडून विरोध राहणार आहे. तसा प्रयत्न कोण करत असेल तर
त्या विरोधात तेवढ्याच ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू. बहुजन समाजातील छोट्या घटकांनी दबून राहू नये. जातीयवादी लोकांच्या कोणत्याही विचाराला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही. वेळप्रसंगी
त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,’ असेही त्यांनी स्पष्ट
केले.
लक्ष्मण माने म्हणाले, ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्यारितीतील विषय आहे. त्याबाबत मराठा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृहात बोलण्याची गरज असताना आज मराठा समाज ज्या पद्धतीने या कायद्याची मागणी करत आहेत. त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. याबाबत चिंता व्यक्त करून समाजामध्ये तेढ वाढू नये म्हणून कार्यकर्त्यांनी संयम पाळावा.’
पार्थ पोळके म्हणाले, ‘कोपर्डीच्या प्रकरणाचे भांडवल करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत चुकीचा गवगवा चालू आहे. सातारा जिल्ह्यात ५ वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार झाला. त्याबाबत मात्र मराठा समाजाने साधा निषेध मोर्चाही काढला नाही.’
अशोक गायकवाड म्हणाले, ‘जो वर्ग गरिबीने पिचलेला आहे, त्यासाठी शासनस्तरावर त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात मोर्चे निघत असताना दलितविरोधी धोरण कोणी राबविण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला ही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे आम्ही भारतीय आहोत; पण आम्हाला कोण डिवचत असेल तर आम्ही अशा प्रवृतींचा बंदोबस्त करू. संघर्ष आम्हाला नवा नाही. संघर्षातून दलितांनी आतापर्यंत इतिहास रचला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी
केला.’
अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत असताना मात्र खैरलांजी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी या दृष्टिकोनातून मोर्चेकरांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. कार्यकर्त्यांनी संयमाने पुढील दिशा ठरवावी.’ (प्रतिनिधी)

गायकवाड, खंडाईत यांना सर्वाधिकार...
यावेळी अनेक मान्यवरांनी भूमिका मांडताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते नोंदविली. तसेच येत्या चार दिवसांत पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. यापुढील बैठकीचे नियोजन आणि सर्वाधिकार अशोक गायकवाड आणि चंद्र्रकांत खंडाईत यांना एकमुखी बहाल करण्यात आले.

Web Title: Opposition to the Atrocity demand for the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.