कोरेगावमधील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 04:12 PM2017-07-23T16:12:53+5:302017-07-23T16:12:53+5:30
प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ; सर्वपक्षीयांचा आंदोलनाचा इशारा
आॅनलाईन लोकमत
कोरेगाव (जि. सातारा), दि. २३ : येथील डी. पी. भोसले कॉलेजमधील प्रवेश प्रक्रियेविषयी व्यवस्थापनाच्या विरोधात सर्वपक्षीय उठाव होत असून, सर्वपक्षीय युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने देखील तातडीने पावले उचलत कॉलेज व्यवस्थापनाला कडक भाषेत समज देणारे पत्र दिले आहे.
काँग्रेसचे नगरसेवक महेश बर्गे, सुनील बर्गे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सागर बा. बर्गे, मनसेचे तालुकाप्रमुख सागर सं. बर्गे, शिवसेनेचे अक्षय घोरपडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमनाथ बर्गे, सुनील बर्गे, सम्राट बर्गे यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी प्रवेश प्रक्रियेविषयी प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांची भेट घेतली होती. त्यांना ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची माहिती देऊन प्रवेश देण्यासाठी विनंती केली होती. मात्र, नियमांचे कारण पुढे करत त्यांनी प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविली होती. एकंदरीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय कॉलेज बंद आंदोलन छेडण्याचा निर्धार केला.
त्याच पार्श्वभूमीवर पदाधिकारी व युवक कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांची भेट घेतली व त्यांच्यापुढे कॉलेजमधील प्रवेश प्रक्रियेविषयी अडचणी विषद केल्या. यावेळी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. प्रांत नलावडे यांनी वस्तुस्थिती जाणून घेत तातडीने कॉलेज व्यवस्थापनाला पत्र दिले असून, त्यामध्ये प्रवेशप्रक्रिया राबविताना आवश्यक ती दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत बापूसाहेब जाधव, अक्षय बर्गे, नरेश बर्गे, तेजस गुरव यांच्यासह कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
आंदोलनाची जबाबदारी कॉलेज व्यवस्थापनाचीच ..
.
सर्वपक्षीय आंदोलनाचे निमंत्रक महेश बर्गे यांनी कॉलेज व्यवस्थापनावर प्रवेश प्रक्रियेविषयी आरोप केले आहेत. दरवर्षी ह्यये रे माज्या मागल्या...ह्ण हाच विषय असतो. आज आम्ही प्रशासनाला निवेदन दिले आहे. काही दिवसांत याबाबत उचित निर्णय न झाल्यास, आंदोलन करणार असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी कॉलेज व्यवस्थापनावर राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.