छबिना मिरवणुकीत मल्लखांबाची प्रात्यक्षिके-सातारा तालुक्यातील आरे गावात नवा पायंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:58 AM2018-04-18T00:58:48+5:302018-04-18T00:58:48+5:30
स्वप्नील शिंदे ।
सातारा : सध्या गावोगावी ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू आहेत. यात्रेनिमित्त निघणाऱ्या छबिन्यामध्ये बँड, लेझीम आणि झांजपथकाच्या तालावर नृत्य सादर केले जाते. मात्र, शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा तालुक्यातील आरे गावात पारंपरिक छबिन्यामध्ये मुलांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
सातारा तालुक्यातील आरे हे कर्नल संतोष महाडिक यांचे गाव. या गावात अनेक तरुण सैन्यात नोकरी करतात. त्यापैकीच एक असलेले माजी सैनिक आणि सध्या सातारा पोलीस दलात कार्यरत असणारे हवालदार भरत महाडिक यांच्या पुढाकाराने गावात मल्लखांब खेळ रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी त्यांना गावातील शिवतेज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर जगदाळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. गेल्या दोन वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मल्लखांबाच्या कवायती सुरू आहेत. विद्यालयातील साधारण २० ते २५ विद्यार्थी दररोज मल्लखांबाचा सराव करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात होणाºया विविध स्पर्धांमध्ये हे विद्यार्थी सहभागी होत आहेत. राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवत असताना आपली कला गावातील लोकांना दाखवण्याची इच्छा भरत महाडिक व खेळाडूंना होती.
गेल्या आठवड्यात गावात ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा होती. या यात्रेत आपले मल्लखांब खेळाचे कौशल्य दाखवण्याचे ठरवले. त्यानुसार यात्रेच्या छबिन्यामध्ये सर्वजण सहभागी झाले. त्यावेळी छबिना गावातील मुख्य चौकात आला असताना खेळांडूनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यास सुरुवात केली. प्रात्यक्षिके पाहून ग्रामस्थांच्या डोळ््याचे पारणे फिटले. यात्रेच्या छबिन्यात या मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा नवा पायंडा पाडून ग्रामस्थांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
२५ खेळाडू सहभागी
एक तास मल्लखांबाचे प्रात्यक्षिकेच
खेळाचे २२ प्रकार केले सादर
२५ खेळाडूंचा सहभाग
ग्रामस्थांकडून ५ हजार रुपयांचे बक्षीस
खेळाडूंना शाळेत मोफत प्रशिक्षण
शाळेच्या आवारात दररोज दोन तास सराव
मी स्वत: मल्लखांब खेळाडू असल्याने त्याबद्दल मला आकर्षण होते. मात्र, हा खेळ कमी होत असल्याचे पाहून दोन वर्षांपासून पुन्हा खेळ रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला ग्रामस्थांनी साथ दिल्याने मल्लखांबाला प्रतिष्ठा मिळाली आहे.
-भरत महाडिक, पोलीस हवालदार व मल्लखांब प्रशिक्षक