केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी विरोधकांकडून जनतेची दिशाभूल : केशव उपाध्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:38+5:302021-02-16T04:39:38+5:30
वाई : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. उद्योजक, व्यापारी, शेतकरी ...
वाई : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. उद्योजक, व्यापारी, शेतकरी व सहकारी संस्था या विरोधकांच्या सरकारविरोधी भूमिकेला बळी पडू नयेत, केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करत आहेत,’ असे उद्गार भारतीय जनता पार्टी प्रदेशचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी काढले.
अर्थसंकल्पाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाची माहिती व्हावी, यासाठी भारतीय जनता पार्टी वाई शहरातर्फे लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या गरवारे हॉल येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाई शहरातील प्रसिद्ध करसल्लागार प्रभाकर सोनपत्की होते. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी केशव उपाध्ये तसेच प्रभाकर सोनपत्की यांनी अतिशय सोप्या व सुलभ शब्दांमध्ये नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर सर्व बाबी सर्वांसमोर मांडल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना भाजप शहराध्यक्ष राकेश फुले यांनी केली. या कार्यक्रमासाठी वाई शहरातील व्यापारी वर्ग, उद्योजक तसेच वेगवेगळ्या बँकांमधील प्रमुख कर्मचारी वृंद तसेच वाईकर नागरिक उपस्थित होते. सरचिटणीस तनुजा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस देवानंद शेलार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सरचिटणीस मनीषा घैसास यांनी आभार मानले.