सातारा जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयनेतून विसर्ग सुरुच, धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर

By नितीन काळेल | Published: August 1, 2024 07:02 PM2024-08-01T19:02:58+5:302024-08-01T19:04:49+5:30

धोम धरणांतून विसर्ग वाढला..

Orange alert for Satara district till Saturday, Koyna dam gates fixed at nine feet  | सातारा जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयनेतून विसर्ग सुरुच, धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर

सातारा जिल्ह्याला शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; कोयनेतून विसर्ग सुरुच, धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर

सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत आॅरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत.

जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. सलग दहा दिवस धो-धो पाऊस कोसळत होता. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतही चांगला पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तर पश्चिम भागात धुवाॅधार पाऊस झाला. कोयना, नवजा, तापोळा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयनासारख्या प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला. मात्र, पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस उघडझाप सुरू राहिली. पण, बुधवारपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे. गुरूवारीही सकाळपासून पाऊस सुरूच होता.

गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत ३ हजार ७६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत ४ हजार ४३६ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात पाथरपूंज नंतर नवजा येथेच सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला २४ तासांत ८४ तर दोन महिन्यांत ४ हजार ९८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पाऊस वाढल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढत चालली आहे.

सकाळच्या सुमारास सुमारे ४५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८५.८१ टीएमसी झाला होता. त्यातच मागील काही दिवसांपासून धरणातून विसर्ग सुरू आहे. पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जाते. त्याचबरोबर धरणाच्या सर्व सहा दरवाजातूनही ४० हजार क्यूसेक विसर्ग कायम आहे. सध्या धरणाचे दरवाजे नऊ फुटांवर स्थिर आहेत.

धोम धरणांतून विसर्ग वाढला..

वाई तालुक्यातील धोम धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी आवक आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सकाळच्या सुमारास ३ हजार ३६४ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दुपारपासून सांडव्यावरुन सुमारे ४ हजार ३०० क्यूसेकपर्यंत विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

Web Title: Orange alert for Satara district till Saturday, Koyna dam gates fixed at nine feet 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.