अशास्त्रीय वळणात खंबाटकी बोगदा

By admin | Published: December 24, 2014 11:23 PM2014-12-24T23:23:25+5:302014-12-25T00:05:09+5:30

राष्ट्रीय महामार्ग : अपघातात अनेकांचा मृत्यू; प्रशासन गांधारीच्या भूमिकेत

Organic twist | अशास्त्रीय वळणात खंबाटकी बोगदा

अशास्त्रीय वळणात खंबाटकी बोगदा

Next

खंडाळा : सातारावरून पुण्याला जाताना राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या धोकादायक वळणावर आजवर शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. महामार्गावर असणाऱ्या असुविधा आणि अशास्त्रीय वळणांचा धोका यास कारणीभूत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.
महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे प्रशासन गांधारीच्याच भूमिकेत आहे. त्यामुळे अशास्त्रीय वळणांच्या फेऱ्यात अडकलेल्या खंबाटकी बोगद्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व जनतेतून होत आहे.
या महामार्गावरील बोगदा ओलांडल्यानंतर लगेचच धोक्याचे वळण आहे. व त्यानंतर तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांचा वेग सांभाळणे चालकांना कठीण जात असते. त्याचबरोबर बोगदा ते खंबाटकी जुना टोलनाका या रस्त्यावर तीन ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. महामार्ग बनविताना शास्त्रीयदृष्ट्या यामध्ये त्रुटी असल्याबाबतचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणच्या इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणावर तर वारंवार अपघात होत असतात. गेल्या तीन वर्षांत एकूण शेकडो लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. अपघात झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करून महामार्ग प्रशासन सुस्तावले जाते. मात्र, यावर कायमस्वरूपी कोणताही मार्ग काढला जात नाही. गेल्या वर्षभराच्या कालखंडात ‘एस’ आकाराच्या वळणावर झालेल्या जीपच्या अपघातात नऊजण, कंटेनरच्या अपघातात एक जण, खासगी बसच्या अपघातात अकराजण, दुचाकीस्वार तीनजण, बोगदा ओलांडल्यानंतर कारच्या अपघातात तीनजण, कारच्या अपघाता चारजण, बुलेटस्वार एक, कंटेनर पलटी झाल्याने गेल्या महिन्यात आठजणांना प्राण गमवावे गाले आहे. तर वर्षभरात शंभराहून अधिक जखमी झाले आहे. बसच्या अपघातानंतर महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही कोणताही बदल झाला नाही. केवळ धोकादायक वळणांवर पांढरे पट्टे ओढून सूचित करण्यात आले आहे. मात्र, अशास्त्रीय वळणे काढून रस्त्याला योग्य वळण देणे, रस्त्याच्या उतार कमी करणे, याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
प्रवशांना धोकादायक ठरणाऱ्या या रस्त्याबाबत तातडीने सुधारणा केल्या जाव्यात आणि सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी गत महिन्यातील कंटनेर अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी उपोषणही केले होते. त्यांनाही कारवाईबाबत आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. पण, महामार्गाच्या सुधारणांच्या कामाला साधी सुरुवातही करता आली नाही.
आमदार मकरंद पाटील यांनीही ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात बदल करण्याबाबत सूचना केल्या आहेत. पण, एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि कामातही बदल नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास आजही जीव मुठीत घेऊन सुरूच आहे. या कर्दनकाळ ठरणाऱ्या वळणांवर प्रवासामधून कधी सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले
आहे. (प्रतिनिधी)


रस्त्यात बदल करण्याची गरज
खंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावर कायम अपघात होतात. बोगद्यातही संरक्षण लोखंडी ग्रील तुटले आहे. त्यानंतरचे वळण व तीव्र उताराबाबतही सुधारणा नाही. केवळ सूचनाफलक लावून अपघात थांबणार नाहीत. रस्त्यात बदल करणे गरजचे आहे.
-किरण खंडागळे, उपसरपंच खंडाळा
खंबाटकीच्या परिसरातील अशास्त्रीय वळणे धोकादायक आहेत. या भागात महिन्यातून तीन-चार तरी अपघात होतच असतात. वळणे काढून रस्ता सुरक्षित केला जावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र हायवे प्राधिकरण लक्ष देत नाही. याबाबत आता मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.
- रामदास कांबळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष

Web Title: Organic twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.