Satara News: महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ जागा सापडली, हरिनारायण मठाच्या कागदपत्रातून माहिती उघड 

By सचिन काकडे | Published: March 16, 2023 04:42 PM2023-03-16T16:42:29+5:302023-03-16T16:43:12+5:30

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसूबाईंची समाधी असल्याचे सिद्ध झाल्याने सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा आता दृष्टीक्षेपात आला आहे

Original site of Maharani Yesubai tomb found, information revealed from Harinarayan Mutt documents | Satara News: महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ जागा सापडली, हरिनारायण मठाच्या कागदपत्रातून माहिती उघड 

Satara News: महाराणी येसूबाईंच्या समाधीची मूळ जागा सापडली, हरिनारायण मठाच्या कागदपत्रातून माहिती उघड 

googlenewsNext

सातारा : राजधानी साताऱ्यातील माहुली हे गाव धार्मिक अंगाने प्रसिद्ध असून, या गावात मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती महाराणी येसूबाई यांची समाधी असल्याचे अखेर शिक्कामोर्तब झाले. सातारा स्थित जिज्ञासा संस्था व संलग्न अभ्यासकांनी इतिहासकालीन पत्रे व नकाशाच्या आधारे समाधीची स्थाननिश्चिती केली आहे.

येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश पंडित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबतची दिली. निलेश पंडित म्हणाले, संगम माहुली गावात शिरत असताना डाव्या बाजूला एक मोठा दगडी चौथरा आहे. या चौथ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुणाबाई यांचे वृंदावन आणि त्याच्या पाठीमागे सगुणेश्वराचे देवालय आहे. सगुणाबाईंचा मृत्यू २५ जुलै १७४८ रोजी झाला. त्यांच्या सामाधीच्या पुढील बाजूस कृष्णा वेण्णामाईची रथ शाळा आहे. या रथ शाळेला लागूनच पूर्वाभिमुख अवाढव्य एक दगडी बांधकाम दिसते. या वास्तूचा चौथरा राजचिन्हाने सजवलेला असून, अतिशय देखण्या स्थापत्य शैलीत त्याचे बांधकाम झालेले दिसते. कालौघात वरील घुमटाचे थोडे नुकसान झाले असले तरी आजमितीस जवळपास ३०० वर्षांनंतरही दगडात बांधलेली ही वास्तू दिमाखात उभी आहे. 

वस्तूसाठी केलेला खर्च व कलाकुसर यावरून ही वास्तू राजघरण्यातील एखाद्या मोठ्या व्यक्तीची समाधी असा अंदाज येतो. परंतु ही समाधी छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच येसूबाईंची असल्याचे माहुली येथील हरिणारायण मठातील १७५६ मधील दस्तऐवज व नकाशाच्या आधारे सिद्ध झाल्याने  सातारच्या इतिहासातील फार मोठा ऐतिहासिक वारसा आता दृष्टीक्षेपात आलेला आहे.

महाराणी येसूबाई फाउंडेशन व जिज्ञासा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून समाधीच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामी माहुली ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने व हरिनारायण मठाचे ट्रस्टी पांडुरंग नेवसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शोध मोहिमेमुळे समाधी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे.

येसूबाईंचे साताऱ्यातच वास्तव्य...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांचे इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सुमारे तीस वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीत औरंगजेबाच्या नजर कैदेत काढल्यानंतर १७१९ मध्ये त्यांचे साताऱ्यात आगमन झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत त्यांचे साताऱ्यातच वास्तव्य होते. त्यांच्या मृत्यूची तारीख अजूनतरी उपलब्ध झालेली नाही. परंतु १७२९ च्या दरम्यान त्यांचा साताऱ्यात मृत्यू झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

अखेर समाधीच्या जागेवर शिक्कामोर्तब..

सहा वर्षांपूर्वी माहुलीतील हरिनारायण मठाच्या कागदपत्रात या समाधीचा नामोल्लेख आढळून आला होता; परंतु त्याची स्थाननिश्चिती होत नव्हती. त्यासाठी जुन्या जाणत्या लोकांकडून घेतलेली मौखिक माहिती, पुराभिलेखागार कार्यालयाकडून मिळालेले दस्तावेज, माहुलीच्या मठाची कागदपत्रे अन् एका जुन्या नकाशाच्या आधारे समाधीचे स्थान निश्चित करण्यात यश आले.

Web Title: Original site of Maharani Yesubai tomb found, information revealed from Harinarayan Mutt documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.