माळशिरस येथील बालगृहामध्ये अनाथ मुलाला अमानुषपणे मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 04:49 PM2019-08-24T16:49:46+5:302019-08-24T16:56:48+5:30
माळशिरस, ता. सोलापूर येथील शासकीय बालगृहामधील चौदा वर्षांच्या अनाथ मुलाला नाका तोंडातून रक्त येईपर्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
सातारा : माळशिरस, ता. सोलापूर येथील शासकीय बालगृहामधील चौदा वर्षांच्या अनाथ मुलाला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सतीश जाधव, अशोक जाधव (काळजीवाहक, रा. बालगृह माळशिरस, ता. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित चौदा वर्षांचा मुलगा अनाथ आहे. तीन वर्षांपासून संबंधित मुलगा माळशिरस येथील शासकीय मुलांच्या वरिष्ठ बालगृहात राहत होता. दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये त्याची नववीची परीक्षा संपल्यानंतर सर्व मुले बालगृहात जेवायला बसली होती. त्यावेळी अनाथ मुलाच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या मुलाला शिंक आली. त्याने शिंकेमधून बाहेर आलेला द्रव त्या अनाथ मुलाच्या ताटात टाकला. त्यामुळे चिडलेल्या अनाथ मुलाने त्याच्या पाठीवर बुक्की मारली.
हा प्रकार तेथे उपस्थित असलेला काळजीवाहक कर्मचारी सतीश जाधव याने पाहिला. त्याने त्या अनाथ मुलाच्या पाठीवर लाथ मारली. त्यानंतर जेवणाच्या ताटावरून शर्टची कॉलर धरून त्याला उठविले. ओढतच त्याला त्याच्या खोलीतील कॉटजवळ नेले. या ठिकाणी दुसरा काळजीवाहक अशोक जाधव याला सतीश जाधवने दोरी आणण्यास सांगितली. त्याने नॉयलॉनची दोरी आणल्यानंतर त्या अनाथ मुलाचे हात-पाय गुंडाळून कॉटला दोघांनी घट्ट बांधले. त्यानंतर दरवाजा बाहेरून लावण्यात आला.
सुमारे अडीच ते तीन तासांनंतर रात्री सर्व मुले खोलीमध्ये झोपण्यासाठी आली. त्यावेळी त्याने मुलांना माझे हात सोडा, अशी विनवणी केली. परंतु काळजीवाहक सतीश जाधव याच्या भीतीमुळे मुलांनी त्याला मदत केली नाही. रात्री साडेअकराच्या सुमारास सर्व मुले झोपी गेल्यानंतर संबंधित अनाथ मुलाने दाताने कशीबशी दोरी सोडवून स्वत:ची सुटका करून घेतली. पुन्हा मारहाण होईल, या भीतीने त्याने तेथून पलायन केले.
काही दिवस त्याने एका ठिकाणी शेताला पाणी पाजण्याचेही काम केले. परंतु येथेही तो जास्त दिवस थांबला नाही. माळशिरस येथील प्रशाळा वसतिगृहात त्याच्या मित्रांनी त्याला मोफत प्रवेश घेऊन दिला. त्यावेळी एका मुलाने त्याला शिवी दिल्याने त्यालाही अनाथ मुलाने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे तेथील शिक्षकांनी हातात दाखला देऊन शाळेतून त्याला हकलून दिले. त्यानंतर संबंधित अनाथ मुलगा पुन्हा मित्रांकडे गेला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी औंध, ता. खटाव येथील एका आश्रमशाळेत त्याला नेले.
या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर त्याला हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने माळशिरस येथे घडलेला सर्व प्रकार त्यांच्यासमोर कथन केला. या घटनेची समितीने दखल घेतल्यानंतर साताऱ्यातील निरीक्षक गृहातील अधीक्षिका संजीवन फुलसिंग राठोड (वय ३२, रा. तामजाई नगर सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माळशिरस येथील बालगृहातील काळजीवाहू कर्मचारी सतीश जाधव व त्याला मदत करणाऱ्या अशोक जाधव याच्याविरुद्ध बाल न्याय अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
रात्रभर मंदिरात आसरा
माळशिरस येथील बालगृहातून पलायन केल्यानंतर संबंधित अनाथ मुलगा सोलापूर जिल्ह्यातील तिरवंडी येथे गेला. त्याने नाका, तोंडातून आलेले रक्त नळावर धुतले. या ठिकाणी त्याने एका मंदिरात रात्रभर आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी त्याने ओळख काढून तीन हजार रुपये पगारावर शेताला पाणी पाजण्याचे कामही काही दिवस केले.