दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान; स्वत:साठी ‘खासगी’त ध्यान!

By admin | Published: October 16, 2015 09:21 PM2015-10-16T21:21:57+5:302015-10-16T22:45:11+5:30

गुरुजी हे वागणं बरं नव्हं : पालिका शाळेतील शिक्षकांची मुलं शिकतायत इतर शाळेत; पालिका प्रशासनाबद्दल नागरिकांतून संताप--पालिकेची‘शाळा’- सहा

Others; Brahmagnas; 'Private' meditation for yourself! | दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान; स्वत:साठी ‘खासगी’त ध्यान!

दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान; स्वत:साठी ‘खासगी’त ध्यान!

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  खरंतर शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे. माणूस जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. प्रत्येक मुलाला घडविण्यासाठी शाळा ही संकल्पना सुरू झाली आणि ज्ञानदान करणाऱ्या व्यक्तीला गुरू, गुरुजी म्हणून संबोधले जाऊ लागले. आई नंतर शिक्षणाचे दुसरे आदरणीय व्यासपीठ म्हणून गुरुजींकडे पाहिले जाते. आज गुरुजींची ओळख ‘सर’ म्हणून होत असली तरी ‘गुरुजी’ या शब्दाची ‘सर’ त्याला येत नसल्याचे दिसत आहे. शिक्षकांजवळ पराकोटीचा आत्मविश्वास असतो, म्हणूनच तो आत्मविश्वास असणारी पिढी तयार करतो; पण कऱ्हाड पालिकेतील शिक्षकांना स्वत:च्याच अध्यापनावर विश्वास नाही, असे म्हणावे लागेल. कारण बहुतांशी शिक्षकांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची मुले खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. मग साहजिकच इतर पालकांनी त्यांच्या अध्यापनावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्न निर्माण होतो.
‘पालिकेची शाळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने गेले सहा दिवस नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांची सद्य:स्थिती मांडली. तेव्हा सुज्ञ नागरिक व पालकांच्यातून बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. एकेकाळी देदीप्यमान परंपरा असणाऱ्या पालिकेच्या शाळांची आज दयनीय अवस्था का झाली आहे? याला कारणीभूत कोण? याबाबत नागरिक बोलू लागले आहेत. पालिका शाळांच्या काही इमारती चांगल्या प्रतीच्या आहेत. मात्र काही ठिकाणी स्वत:ची इमारतच नाही. बऱ्याच ठिकाणी क्रीडांगण नाही. गळक्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नाहीत. खिडक्यांना दारे नाहीत. घाणीचे साम्राज्य आहे आणि या सर्वाला पालिका प्रशासन आणि तेथे काम करणारे शिक्षकच जबाबदार आहेत, असे सर्वजण बोलू लागले आहेत. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी या पालिका शाळांमध्ये नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांची मुले शिकली पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थाने या लोकप्रतिनिधींना येथील प्रश्नांची जाणीव होईल.
त्यानंतर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांची व त्यांच्या कुटुंबातील मुले कोठे शिकतात, याचा जरी शोध घेतला तरी त्याचे समाधानकारक उत्तर सापडू शकत नाही. बहुतांशी शिक्षकांची व त्यांच्या कुटुंंंंबातील मुले खासगी शाळेतच शिकली आहेत आणि शिकतही आहेत. म्हणजे आपल्या शाळेच्या गुणवत्तेबाबत किंवा एकूणच नगरपरिषदेच्या शाळेतील शिकवण्याबाबत दस्तूरखुद्द तेथीलच शिक्षक शंका घेत आहेत, असे वाटते. शिक्षकांनीही अंर्तमुख होऊन विचार केल्यास शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. (समाप्त)



स्वच्छतेचं करायचं तरी काय ?
नगरपरिषदेच्या शाळांमध्ये ‘शिपाई’ हे पदच नसल्याने शाळेची तसेच परिसराची स्वच्छता कोणी करायची हा खरा प्रश्न आहे. पालिकेचे सफाई कामगार कित्येक दिवस या स्वच्छतेसाठी शाळांकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडूनच ही सफाई करून घेतली जाते. साहजिकच आपल्या पाल्याकडून असे काम करून घेणे आज शहरी मानसिकतेतील पालकाला न रुचणारे आहे. ही बाब गत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आमसभेत मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी मांडली होती. मात्र, त्यानंतरही काही कारवाई झाल्याचे दिसत नाही.


कऱ्हाड नगरपरिषदेच्या सर्वच शाळा गुणवत्तेमध्ये अग्रेसर असाव्यात, अशी आमची धारणा आहे. शाळा क्र. ३ ने ‘आयएसओ’ मानांकन मिळवून कऱ्हाडच्या लौकिकात भरच घातली आहे. नजीकच्या काळात सर्व शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी पालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.
- अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, नगराध्यक्षा, कऱ्हाड
नगरपालिका जो शिक्षण कर घेते, त्याचा विनियोग त्याच कारणासाठी व्हायला पाहिजे. मात्र कऱ्हाड पालिकेच्या शाळांंची अवस्था पाहिल्यानंतर, तेथील भौतिक सुविधा पाहिल्यानंतर हा निधी नेमका कोठे गेला, असा प्रश्न पडतो. तसेच जर हा निधी अन्य कोणत्या ठिकाणी वर्ग झाला असेल, तर संबंधितांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही लवकरच प्रांताधिकाऱ्यांकडे करणार आहोत.
- सागर बर्गे, शहराध्यक्ष, मनसे


नगरसेवकांचे शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
अनेक नगरसेवकांच्या स्वत:च्या खासगी शिक्षण संस्था आहेत. त्यामधून त्यांना चांगला मलिदा मिळतो. पालिकेच्या शाळा जर गुणवत्तापूर्ण चालू लागल्या तर आपली दुकानदारी बंद होईल, या भीतीने नगरसेवक जाणीवपूर्वक पालिका शाळांकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशा नगरसेवकांना जनतेने जाब विचारला पाहिजे. हा जाब विचारण्यास शिवसेना मागे राहणार नाही.
- रामभाऊ रैनाक, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना


नगरपालिकेच्या शाळांच्या दुरवस्थेला नगरसेवकांची अनास्था कारणीभूत आहे. नागरिकांनी त्यांना एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर शहरातील सर्व चांगल्या, वाईट गोष्टींना ते जबाबदार असतात. गेल्या काही वर्षांत नगसेवकांची पालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तेथील पटसंख्या आणि गुणवत्ता ढासळली आहे. याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारलीच पाहिजे. आणि यामध्ये लवकरच त्यांनी सुधारणा केली नाही तर ‘भाजपा’च्या वतीने आम्ही आंदोलन करू व प्रशासनाकडून चौकशी करायला लावू.
- विष्णू पाटसकर, जिल्हा सरचिटणीस, भाजप

Web Title: Others; Brahmagnas; 'Private' meditation for yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.