..अन्यथा भीक मांगो आंदोलन करू!
By admin | Published: September 30, 2015 10:17 PM2015-09-30T22:17:34+5:302015-10-01T00:32:57+5:30
बनुबाई येलवे : ‘आरपीआय’चा कऱ्हाडमध्ये मोर्चा : तहसीलदारांना निवेदन
कऱ्हाड : ‘शासनाने अवैध धंद्यावर कारवाई करून रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी व तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, अन्यथा आम्ही भीक मांगो आंदोलन करू,’ असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या कऱ्हाडच्या महिला आघाडी प्रमुख संघटक बनुबाई येलवे यांनी दिला.रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाडच्या महिला आघाडी प्रमुख संघटक बनुबाई येलवे यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांबाबत निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना निवेदन दिले.
यावेळी सुनीता पाटील, कमल सावंत, विजया भंडारे, शालन भंडारे, सुवर्णा भंडारे, सुजाता टोमळे, सुमन पवार, मीनाक्षी दबडे, मीना मोरे, सुमन माने, मनीषा कांबळे, भीमाबाई बनसोडे, शारदा शिवशरण, रेखा भिंगारदेवे, लक्ष्मी साठे, शारदा मोहिते, संगीता वायदंडे, पद्मा थोरात आदींसह टेंभू, कार्वे, हजारमाची, करवडी, मलकापूर परिसरातून महिलांची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की, मद्यविक्री व मटका यावर शासनाकडून बंदी घालण्यात आली असली तरी ते छुप्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने यावर तत्काळ कठोर पावले उचलून समाजाचे होणारे नुकसान थांबवावे. सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमजूर तसेच महिलांना कामधंदा मिळणे कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतमजुरांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून रोजगार हमी योजनेचे कामेदेखील सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतमजूर अवैद्य धंद्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत चालले आहेत. (प्रतिनिधी)