...अन्यथा लोकप्रतिनिधींच्याही दारात कचरा टाकू : वेदांतिकाराजे
By admin | Published: December 9, 2015 11:38 PM2015-12-09T23:38:18+5:302015-12-10T01:02:30+5:30
स्वच्छता अभियान : सहभागी होण्याचे सातारकरांना आवाहन
सातारा : ‘शहरामध्ये सध्या कचऱ्याची समस्या फार मोठी आहे. स्वच्छ शहर राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यामध्ये सर्व घटकांनी सहभागी होऊन कर्तव्य सोशल ग्रुपच्या स्वच्छता जनजागृती अभियानाला साथ द्यावी. सातारा शहर कचरामुक्त झाले नाही तर वेळप्रसंगी जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दारातही आम्ही कचरा टाकण्यास मागे पुढे पाहणार नाही, मग दोन्ही राजेंचे बंगले असले तरी हरकत नाही.’ असा खणखणीत इशारा कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, शहर आणि उपनगरांमध्ये अस्ताव्यस्त साचलेले कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरत असते. या कचऱ्याला आपणच जबाबदार असतो. शहरातील प्रत्येक वार्डात, गल्ली-बोळात आणि शाहूपुरी, शाहूनगर, विसावा पार्क या उपनगरांमध्येही रोजच्यारोज घंटागाडी फिरत असते. तरीही सुशिक्षित लोक आणि महिला कचऱ्याने भरलेली प्लॅस्टिकची पिशवी रस्त्यावर, नाल्यात, ओढ्यात टाकताना दिसतात. यासाठी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.’
वेदांतिकाराजे पुढे म्हणाल्या, जाणीव आणि जनजागृती हा अभियानाचा पहिला टप्पा असून, याअंतर्गत कर्तव्य सोशल गु्रपच्या माध्यमातून कचरा निर्मूलनाशी निगडीत विविध प्रकारचे फलक शहरात आणि उपनगरात लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून कचरा अस्ताव्यस्त टाकणाऱ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी आणि कचऱ्याची समस्या मुळापासून उखडण्यासाठी प्रत्येक नागरिकाला सामाजिक बांधिलकीची जाणीव होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवकांना २० डिसेंबरची डेटलाईन !
नगरसेवकांनीही आपला वार्ड स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे. अन्यथा दि. २० डिसेंबर नंतर एखाद्या वार्डात कचऱ्याचा ढीग दिसला तर, तो कचरा संबंधित नगरसेवकाच्या घरासमोर टाकून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यामुळे ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी सर्व नगरसेवक, शहराशी निगडीत असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्यांनी आपला वार्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सुरुवात करावी, असे आवाहनही वेदांतिकाराजे यांनी केले.