आमचा मास्क हनुवटीलाच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:17+5:302021-02-23T04:57:17+5:30
राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव वाढत आहे. यामुळे राज्य शासन, प्रशासन चिंतेत आहे. तरीही असंख्य सातारकर मात्र तोंडाला ...
राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव वाढत आहे. यामुळे राज्य शासन, प्रशासन चिंतेत आहे. तरीही असंख्य सातारकर मात्र तोंडाला मास्क न बांधताच बिनधास्तपणे वावरत असतात. त्यांचा मास्क हनुवटीला लावलेला असतो. पोलीस दिसले की तो तोंडाला लावला जातो. (छाया : जावेद खान)
०००००००
निबंध स्पर्धेत यश
सातारा : जयंत प्रतिष्ठान व कोरेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील खुल्या गटात पोगरवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक सुभाष शिवाजी चव्हाण यांनी दि्वतीय क्रमांक मिळविला. यशाबद्दल कौतुक होत आहे.
०००००००
जयंती साजरी
सातारा : सातारा एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष आमदार दिवंगत केशवराव पाटील यांची जयंती अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, सुनील झंवर, शुभदा पवार, आशिष पवार, सुहास कुलकर्णी, एस. एम. शेक, अजित साळुंखे आदी उपस्थित होते.
००००००००
कलिंगड दहाला एक
सातारा : साताऱ्यातील जुना मोटार स्टॅण्डमध्ये दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. यामध्ये कलिंगडाचे दर चांगलेच उतरलेले दिसत होते. सरासरी दहा रुपयांना एक कलिंगड विकले जात होते. त्यामुळे ते खरेदीसाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती. तसेच इतर फळेही विक्रीसाठी उपलब्ध होती.
०००००००००
लिंबांचे दर तेजीत
सातारा : साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत रविवारी लिंबांची आवक खूपच मंदावली होती. सरासरी दहा रुपयांना चार लिंबे दिली जात होती. उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने सरबतासाठी लिंबांना मागणी असते. मात्र दर तेजीत असल्याने मागणीही घटलेली पाहायला मिळाली.
०००००
अभिवादन...
सातारा : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनी सातारा तोफखाना येथे लहुजी वस्ताद साळे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष अनिल बडेकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मच्छिंद्र आवारे उपस्थित होते.
०००००००००
साताऱ्यातील वातावरणात सतत बदल
सातारा : सातारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. दिवसभर कडक ऊन असले तरी गार वारे वाहत असल्याने गारठाही जाणवत आहे. त्यामुळे थंडी वाजत आहे. उन्हात गेले तर तेही सहन होत नाही. वातावरणातील बदलाने डोके दुखणे, अंगदुखी आदी त्रास जाणवू लागला आहे.
००००००
रस्त्यावर दगडांची रास
सातारा : सातारा जिल्ह्यातील ऊस वाहतूक अंतिम टप्प्यात असल्याने बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक केली जाते. मात्र चढावर ऊस वाहतूक करणे जिकिरीचे होत असल्याने टायरखाली दगड लावले जातात. मात्र चढ चढून गेल्यानंतर हे दगड बाजूला केले जात नाहीत.
०००००००००००
सॅनिटायझरचा विसर
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सॅनिटायझरचा वापर केला जात होता. मात्र आता त्याचा सोयीस्करपणे विसर पडायला लागला आहे. बहुतांश दुकानांसमोर केवळ स्टॅण्ड उभे केलेले असते. त्यामुळे सॅनिटाईज मात्र केले जात नाही. यामुळे कोरोनाचा शिरकाव वाढण्याचा धोका आहे.
००००००००
पुन्हा नोंद गरजेची
सातारा : कोरोना काळात आपण कोठे कोठे गेलो होतो, याबाबत नोंदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवाहन केले होते. कापड दुकान, सलून दुकानात त्यांच्या नोंदी केल्या जात होत्या. त्यानंतर ते बंद झाले आहे. राज्यातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता, या नोंदी पुन्हा सुरू करणे गरजेचे बनले आहे.
००००००
गवत काढले
सातारा : सातारा शहर परिसरातील अनेक भागातून ओढे गेले आहेत. त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले होते. त्यामुळे अडगळ मोठ्या प्रमाणावर तयार झाली होती. सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे गवत काढले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात मैदान झाले आहे.
०००००००००
महागाईने त्रस्त
सातारा : डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मालाच्या वाहतुकीचा खर्च वाढत आहे. साहजिकच महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. घरातील आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.