आमचा पक्ष.. आमचे सरकार - बाबाराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:17+5:302021-03-30T04:22:17+5:30
देगावसारख्या ग्रामीण भागातली मी एका सामान्य कुटुंबातली महिला.. स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांची कार्यकर्ती. त्यांनी मला २००१-०२ साली पक्षीय राजकारणात संधी ...
देगावसारख्या ग्रामीण भागातली मी एका सामान्य कुटुंबातली महिला.. स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांची कार्यकर्ती. त्यांनी मला २००१-०२ साली पक्षीय राजकारणात संधी दिली. त्यानंतर त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बाबाराजेंनी मी कार्यकर्ती म्हणून आधार देऊन राजकारणात ताकद देण्याचे काम केले. मतदारसंघ विभागले गेले तेव्हा आम्हाला कोणी वाली नाही, असा विचार मनात आला होता. परंतु भाऊसाहेब महाराजांच्या निधनानंतर जेव्हा जेव्हा मी गावातील भागातील लोकांची कामे घेऊन बाबाराजे यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी विधानसभा मतदारसंघात नसतानाही लोकांची कामे केली आणि आजही करीत आहेत.
देगावमध्ये पाटेश्वर विकास सेवा सोसायटीची मान्यता मिळवून देण्यासाठी बाबाराजेंनी खूप प्रयत्न केले आणि अखेर यश मिळाले. आज ही संस्था नव्या जोमाने प्रगतिपथावर आहे. संस्थेचे काम बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने चालू आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत मला संचालिका म्हणून काम करण्याची संधी बाबाराजेंनी दिली आणि वहिनीसाहेब यांनीही मला ताकद दिली. त्यावेळी स्वत: च्या मतदानाचा फायदा न बघता फक्त भाऊसाहेब महाराजांची कार्यकर्ती म्हणून त्यांनी मला संधी दिली. बाबाराजेंच्या जवळ कधी गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नसतो. त्यांच्याबरोबर अगदी मोकळेपणाने कार्यकर्ते आपले प्रश्न, कोणते ही विषय बोलू शकतात. कोणताही दबाव येत नाही. हे पालकत्व बाबाराजेंच्यात आम्हाला नेहमीच बघायला मिळते. दबाव असण्यापेक्षा प्रभाव असणे महत्त्वाचे असते आणि प्रभाव हा त्यांच्या विकासाभिमुख कामांमधून दिसतो. भाऊसाहेब महाराजांनी सहकाराचे जाळे उभे केले. तालुक्यातील संस्थांची उभारणी करत असताना अनेक संकाटांना सामोरे जावे लागले. आज ह्या संस्था टिकविणे, वाढविणे तितकेच महत्त्वाचे काम आहे. आज अजिंक्यतारा कारखाना सभासदांचे हित जोपासून नंबर एक आदर्श कारखाना म्हणून गौरवला जातो. याचेच एक उदाहरण आहे.
जे हाय ते हाय जे नाय ते नाय अशा परखड विचारधारा घेऊन बाबाराजे लोकांचे प्रश्न अडचणी सोडवत असतात. नुसतं तोंडावर गोड बोलून वेळ काढायची हे त्यांना रुचत नाही. बँकेत संचालिका म्हणून काम करत असताना स्वत:चे विचार मांडायचे अन् योग्य विषयाला अनुमती देऊन त्या विषयांची पाठराखण करून ताकद देण्याचे काम बाबाराजे नेहमीच करतात, त्यांच्यात भाऊसाहेब महाराजांचा उत्तराधिकारी कसा असावा ह्याची अनुभूती येते.
पितृत्व, दातृत्व आणि कर्तव्य या तिन्हींचा संगम म्हणजे आमदार शिवेंद्रसिंहराजे (बाबाराजे) यांचे नेतृत्व एक आदर्श नेता म्हणजे बाबाराजे.
कांचन साळुंखे
संचालिका, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा