गुंडगिरी मोडून काढणे ही आमची परंपरा

By Admin | Published: November 16, 2016 11:04 PM2016-11-16T23:04:50+5:302016-11-16T23:04:50+5:30

उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयार

Our tradition is to break hooliganism | गुंडगिरी मोडून काढणे ही आमची परंपरा

गुंडगिरी मोडून काढणे ही आमची परंपरा

googlenewsNext


उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयार
सातारा : सातारा शहरात असलेली गुंडगिरी मोडून काढण्याची आणि सुशासन राखणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे.आमच्या आदरयुक्त दहशतीबद्दल, समाज सांगेल ते प्रायश्चित्त आम्ही घेण्यास केव्हाही तयार आहोत. आमचे विरोधक मात्र आमच्या नैतिक वचकाची धडकी घेवून गर्भगळीत झाले आहेत. उसनं अवसान आणुन, कथित दहशत संपवण्याचा, न वाजणारा ढोल उर फाटेपर्यंत बडवत आहेत. असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर केला.
सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी संजोग कदम आणि प्रभाग क्रमांक १० मधील साविआचे मनोज शेंडे, संगिता आवळे या उमेदवारांच्या प्रचार प्बैठकीत नागरिकांशी सुसंवाद साधताना उदयनराजे बोलत होते.
ते म्हणाले, ‘सर्वसामान्य रिक्शावाले आणि नागरीक यांना तत्कालीन होणाऱ्या दंडेलशाहीच्या त्रासापासून सुटका करणारे फक्त एकच व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत दादामहाराज उर्फ प्रतापसिंहमहाराज हेच होते. त्यांच्या पश्चात गल्लोगल्लीच्या तथाकथित दंगेखोरांवर आमचा नैतिक वचक समाजावर अन्याय होवू नये म्हणून कायम राहीला आहे आणि यापुढेही राहणार आहे.
कोणत्याही निवडणुकीत, प्रचारात कोणताही विधायक मु्द्या नसला की आमची दहशत आहे हा हमखास राखुन ठेवलेला मुद्दा बाहेर काढला जातो. त्यामुळे दहशत हा शब्दच सातारा जिल्ह्यात बोथट झाला आहे. आमची जर दहशत असती तर आम्ही खुलेआम जनतेमध्ये मिसळलो नसतो. कायम स्वत:ला स्वसंरक्षणात ठेवून बाउंसर घेवून वावरलो असतो. दहशतवाद करणाऱ्यास अनेक शत्रु तयार होत असतात आणि दहशतीखाली केलेल्या अन्यायामुळे समाजात अशा व्यक्तीविषयी चीड असते. आम्ही मात्र केव्हाही, कधीही आणि कुठेही जाण्यास तयार असतो. नागरीकांच्या मदतीला धावून जात असतो, असे धावून जाणे हीच जर दहशत असेल तर ती दहशतीची संकल्पना आम्हाला मान्य आहे.
याउलट आम्ही भ्रष्टपणा कधीच केला नाही, भ्रष्टाचार करण्याची संधी सुध्दा मिळु नये म्हणून आमच्या स्वत:च्या सहभागाने कधीही सहकारी संस्था काढल्या नाहीत. मात्र, त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये आमचे नेतृत्व आहे. अनेक संस्थांच्या निर्मितीमध्ये आमचे योगदान आहे. अनेक संस्थांना आम्ही आमच्या पध्दतीने लागेल ते सहकार्य करीत असतो. मात्र संस्था काढायच्या त्या माध्यमातुन निधी उभारायचा, सरकारी अनुदाने घ्यायची, पुन्हा संस्था डबघाईला आली म्हणून ती मोडीत काढून त्या संस्थेचा हवातसा वापर करायचा हे आमच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. अशा संस्थांमध्ये असलेल्या कामगार वर्गास किती पगार दिला जातो हा एक संशोधनाचा विषय आहे. असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. (प्रतिनिधी)


समाजहिताची दहशत आम्हास मान्य...
उदयनराजे म्हणाले, कामगारांना आमचे पडेल ते काम करा अशी वागणुक देवून कायम आर्थिक बंधनात ठेवून आर्थिक दहशतवाद माजवण्यापेक्षा, समाजाच्या हिताची असलेली दहशत आम्हास मान्य आहे. त्याकरीता समाज सांगेल ते प्रायश्चित आम्ही घेण्यास तयार आहोत तुम्ही मात्र तुमच्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत पृथ्वीतलावरील कोणते प्रायश्चित घ्याल, हा मोठा प्रश्न आहे, असेही शेवटी ते म्हणाले.

Web Title: Our tradition is to break hooliganism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.