शिरगावची दीडशे एकर जमीन अधिकाऱ्यांनी घेतली नियमबाह्य
By admin | Published: June 4, 2015 10:34 PM2015-06-04T22:34:57+5:302015-06-05T00:13:25+5:30
ग्रामस्थांचा आरोप : संपादन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सातारा : युती शासनाच्या काळात तारळी धरणाचे काम झाले. हे काम करण्यापूर्वीच तारळी नदीच्या डाव्या बाजूकडील बागायती पट्यातील गावांची नियमबाह्य जमीन संपादीत केली आहे. त्यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील शिरगाव या एकट्या गावाची १५० एकर जमीन तत्कालीन अधिकाऱ्यांनी घेतली आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला.
तसेच तत्कालिन अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांची हक्काची जमीन गेली असून ती परत मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणींचे निवेदन शिरगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिले.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री विजय शिवतारेही उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, शिरगाव हे गाव बागायती आहे. या गावाला यशवंतराव चव्हाण सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित या उपसासिंचन योजनेखाली जमीन ओलिताखाली आहे. असे असताना तारळी प्रकल्पाच्या तत्कालिन कार्यकारी अभियंत्यांनी मात्र शासनाचा आदेश डावलला आहे. हे गाव लाभक्षेत्रातून १९८५ आणि १९९६ ला वगळले आहे. त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी नियम धाब्यावर बसवला आहे. त्यांनी दीडशे एकर जमीन घेतली आहे.
ही जमीन ओलिताखाली आम्ही आणली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे सुमारे तीन कोटी रूपयांचे कर्ज काढले होते. त्या कर्जाचा बोजा आजही सातबाऱ्यावर आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पोलिसांचा धाक दाखवून जमिनीचे संपादन केले आहे. ती जमीन परत मिळावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहे.
संभाजी थोरात, राजू यादव, रणजीत यादव, राजेंद्र घाडगे, प्रमोद यादव, प्रितम यादव, धोंडिराम यादव, धनाजी सोनवले, युवराज यादव, शंकर गायकवाड, माजी शिक्षणाधिकारी हरीभाऊ गायकवाड, उस्मान मुजावर आदींनी व्यथा पालकमंत्री यांच्याकडेही मांडल्या. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
शिरगावचे ग्रामस्थ आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. त्याचवेळी पालकमंत्र्यांनाही ही बाब चुकीची असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. पालकमंत्री शिवतारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
बागायत पट्यातील जमीन संपादीत झाली असल्याने शेतकऱ्यांची हक्काची जमीन गेली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच ती जमीन परत मिळावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही शिरगाव ग्रामस्थांनी केली आहे. शिरगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा अपली व्यथा तीव्रपणे मांडली. तसेच त्यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यासमोरही आपली बाजू स्पष्टपणे मांडताना जमीन परत देण्याची मागणी केली.