निकटसंपर्कातील ४१ पैकी १८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:29+5:302021-07-01T04:26:29+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेली पाच गावे कोरोनासाठी संवेदनशील ठिकाणे बनली आहेत. बाधितांच्या संख्येत आमूलाग्र ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेली पाच गावे कोरोनासाठी संवेदनशील ठिकाणे बनली आहेत. बाधितांच्या संख्येत आमूलाग्र वाढ होऊ लागली आहे. कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कातील ४१ जणांच्या केलेल्या तपासणीत अठराजण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्रे आहेत. सतरा गावांसह वाडी-वस्त्यांचा यामध्ये समावेश होतो. सध्या कोळे, पोतले, किरपे, तारूख आणि विंग ही गावे कोरोनाची केंद्रे झाली आहेत. कोळे येथे २६, पोतले येथे २९, किरपेत २६, तारूखमध्ये ४७, तर विंग येथे २१ रुग्ण बाधित झाले आहेत, तर इतर गावांमध्ये शिंगणवाडीत १, आणे, कोळेवाडी, चचेगाव येथे प्रत्येकी सहा, येणकेमध्ये १६, कुसूर ४, घारेवाडी येथे १६, येरवळेत तीन कोरोनाबाधित आहेत, तर बामणवाडी, अंबवडे, वानरवाडी, शिंदेवाडी आणि वाड्या-वस्तीवर एकही कोरोनाबाधित नाही.
कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सतरा गावांमध्ये आजअखेर १४६१ रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी ११९५ रुग्ण बरे झाले आहेत, तर २०९ रुग्ण बाधित आहेत. त्यापैकी दीडशे घरीच उपचार घेत आहेत. ५९ बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजअखेर ५७ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या सतरा गावांत कोरोना तपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांसह व्यावसायिक आणि अन्य आजारी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तारूख येथे आरोग्य, महसूल आणि स्थानिक समितीच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाधितांच्या संपर्कात आलेल्या ४१ लोकांची तपासणी करण्यात आली. पैकी अठरा रुग्ण बाधित आढळले. सर्व बाधितांना आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल होण्यास प्रवृत्त करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी डाॅ. विद्या घोडके, पंकज नलवडे, संतोष जाधव, जमाले इनामदार, तलाठी लांढे, उपसरपंच दत्तात्रय पाटील, पोलीस पाटील सतीश भिसे यांनी परिश्रम घेतले.
चौकट :
तारूख येथे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तपासणी केली. तपासणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडे वरून सॅनिटायझर कमी येत असल्याने सॅनिटायझरची कमतरता दिसून आली. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सॅनिटायझरची मागणी केली असता त्यांनी सॅनिटायझर देण्यास विरोध केला. परिणामी जीव धोक्यात घालून तपासणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना तपासणी शिबिरे ज्या गावात घेण्यात येतील, त्या ग्रामपंचायतींनी सॅनिटायझर, गावातून फवारणीसाठी पुढाकार घ्यावा.