म्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:36 PM2019-11-08T12:36:09+5:302019-11-08T12:40:41+5:30
म्हसवड पालिका हद्दीत काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले आहे. शहरातील बहुतांशी खासगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.
म्हसवड : म्हसवड पालिका हद्दीत काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले आहे. शहरातील बहुतांशी खासगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत.
आजाराने जनता हैराण झाली असून, याबाबत पालिका प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडूनही कोणतेही उपाय राबवले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे.
म्हसवड हे माण तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले शहर असून, याठिकाणी ह्यकह्ण वर्ग असलेली सर्वात जुनी नगरपरिषद आहे. शहरात हेमाडपंथातील श्री सिद्धनाथाचे मोठे मंदिर असून, हे मंदिरच शहराचे वैभव आहे.
या देवाच्या दर्शनासाठी शहरात भाविकांची दररोज मोठी रेलचेल सुरूअसते. शहरात अनेक खासगी मोठी रुग्णालये व छोटे दवाखाने आहेत. शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र ही कार्यरत असून, सध्या या आरोग्य केंद्रासह शहरातील विविध रुग्णालयांसह छोट्या दवाखान्यात पालिका हद्दीतील बहुसंख्य नागरिक चिकन गुणिया, डेंग्यू, मलेरीयासारख्या आजाराच्या लक्षणांनी ग्रासले आहेत.
शहरात काही दिवसांपासून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून, या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. शहरात विविध साथीच्या रोगाने थैमान घातले आहे.
भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असलेल्या म्हसवड शहराला अनेक वाड्यावस्त्यांनी जोडले आहे. मासाळवाडी, वीरकरवाडी, बनगरवाडी, मानेवाडी, राऊतवाडी, मानेवस्ती, शेरी बेघर वसाहत, मल्हारनगर, केवटेमळा, इनामवस्ती, पानमळा, बोनेवाडी, लोखंडेवस्ती ढोकमोडा, उद्यमनगर हा वाड्यावस्त्या असलेला भाग आहे.