औंध परिसरात ऊसावर हुमणीचा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:26 AM2021-07-20T04:26:13+5:302021-07-20T04:26:13+5:30
औंध : औंधसह परिसरातील व विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना ...
औंध : औंधसह परिसरातील व विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे तर यात भर म्हणून पिकांना हुमणी लागल्याने यंदाचा खरीप हंगाम कसा साधणार, या चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.
औंधसह परिसरात पावसाचा खंड पडल्याने हुमणीने सर्व पिकांवर आक्रमण केले आहे. प्रमुख नगदी पीक असणाऱ्या ऊसावर हुमणीने आक्रमण केले आहे. याबरोबरच आले आणि भुईमूगही लक्ष्य केले आहे. खरीप हंगामात पावसाच्या जीवावर पीक घेणारे असंख्य शेतकरी आहेत. बहुतांश ठिकाणी भुईमुगाची लागवड केली जाते. यावर्षी खाद्यतेलाच्या किमती भडकल्याने तेलबिया उत्पादनाकडे शेतकरी वळू लागला आहे. मात्र, भुईमुगाची मुळीच हुमणी खात असल्याने झाडे सुकून गेली आहेत. आले पिकाचाही कंद कुरतडत असल्याने कोंब सुकत आहे.
हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून सापळे लावण्यात आले होते. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. हुमणी नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी, औषधे देऊन मेटाकुटीला आले आहेत. मात्र, दमदार पाऊस पडल्याशिवाय हुमणीचा बंदोबस्त होणार नाही.
(चौकट)
दमदार पावसाची अपेक्षा...
औंधच्या पश्चिमेला पावसाची दमदार हजेरी आहे, तर पूर्वेला अत्यल्प पाऊस असल्याने तिथे हुमणीने जोर केला आहे. त्यामुळे सगळीकडे दमदार पावसाची अपेक्षा आहे.
१९ औंध
फोटो: औंधसह परिसरात हुमणीने पिकांवर आक्रमण केल्याने पिके कोमेजू लागली आहेत. (छाया : रशिद शेख)